वेध माझा ऑनलाइन - काश्मीरला 1990 च्या दशकात नेण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू आहेत. काश्मीरमधील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही देशद्रोही घटकांनी पुन्हा एकदा काश्मिरी हिंदू आणि काश्मीरमध्ये राहणार्या गैर-काश्मिरींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यादरम्यान, खोऱ्यात राहणाऱ्या काश्मिरी हिंदूंनाही धमकीची पत्रे मिळाली आहेत, ज्यात त्यांना एकतर इस्लाम स्वीकारण्याचा किंवा काश्मीर सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. जर त्यांनी आज्ञा पाळली नाही तर त्यांना मारले जाईल. ही धमकीची पत्रे लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेनं पाठवली आहेत.
या वृत्ताला दुजोरा देताना बारामुल्ला येथे राहणारे काश्मिरी पंडित विजय रैना यांनी सांगितलं की, त्यांनाही असे धमकीचे पत्र आले होते. त्यांना एकतर इस्लाम स्वीकारण्याची किंवा काश्मीर सोडण्याची किंवा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. रैना यांनी सांगितलं की, हे पत्र त्यांना लष्कर-ए-इस्लाम नावाच्या संघटनेनं पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या हिंदूंना इशारा दिला आहे की पंतप्रधान मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोघेही काश्मिरी पंडितांचे प्राण वाचवू शकत नाहीत.
पुढे रैना सांगतात की, हे धमकीचे पत्र त्याला एकट्याला पाठवलं नव्हतं. बारामुल्ला येथील विरवान कॉलनीत राहणाऱ्या सर्व काश्मिरी पंडितांना हा इशारा देण्यात आला आहे. या वसाहतीत पंतप्रधान पॅकेज अंतर्गत काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडित कार्यरत आहेत.
रैना यांनी लष्कर-ए-इस्लामला स्पष्टपणे सांगितले की, काश्मिरी पंडित आता या धमकीच्या पत्रांना घाबरत नाहीत. काश्मिरी पंडितांचा काश्मीरवर पूर्ण अधिकार आहे. ज्याप्रमाणे सामान्य काश्मिरींना मुस्लिम समाजात शांतता आणि प्रगती हवी आहे, त्याचप्रमाणे पंडितांनाही त्यांच्यासोबत विकासाच्या मार्गावर चालायचे आहे. सामान्य काश्मिरी मुस्लिम देखील दहशतवादाला कंटाळले आहेत आणि आता त्यांना परस्पर बंधुभावाने शांततेने जगायचे आहे.
काही देशद्रोही घटकांना काश्मीर खोऱ्यातील बदलती परिस्थिती पसंत नाही. त्यांना अशी कृत्ये करून काश्मिरी हिंदूंमध्ये भीती निर्माण करायची आहे. जातीय सलोखा राखण्यावर भर देत रैना यांनी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांना दोषींना अटक करण्याची विनंती केली. पाकिस्तान आणि काश्मीरच्या शत्रूंबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. आता या धमकीच्या पत्रांना काश्मिरी पंडित घाबरणार नाहीत.
यासोबतच रैना यांनी जम्मू-काश्मीर पोलीस आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना आवाहन केलं की, हे पत्र काश्मीर खोऱ्यात आणखी घातपाताची पूर्वसूचनाही ठरू शकते. म्हणूनच ते गांभीर्याने घेणे अत्यंत आवश्यक आहे. काश्मीर खोर्यात काही महिन्यांत ज्या प्रकारे टार्गेट किलिंगचे प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे हत्यांची ही मालिका थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
गेल्या बुधवारी दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यात एका काश्मिरी हिंदू सतीश कुमार सिंह यांची घरात घुसून हत्या केली. यापूर्वी 4 एप्रिल रोजी शोपियान जिल्ह्यात काश्मिरी पंडित बाल कृष्ण भट यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. भट हे शोपियानमधील छोटीगाम येथे औषधांचे दुकान चालवतात. श्रीनगर येथील लष्कराच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर भट यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले. प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संलग्न असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
No comments:
Post a Comment