Monday, April 11, 2022

वेध माझा ऑनलाइन - पाच महिन्यांपासून संपावर असलेले एसटी कर्मचारी शुक्रवारी शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक  घराबाहेर एकत्र आले. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत शरद पवारांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला. राज्यातील इतक्या मोठ्या नेत्याच्या घरावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यातच आता एक पत्र समोर आलं आहे. ज्यामुळे पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात पोलिसच जबाबदार आहेत का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.


शरद पवार यांच्या सिल्वर ओक घरावर आंदोलन होणार असल्याची माहिती आधीच म्हणजेच 4 एप्रिला पोलिसांना मिळाली होती अशी माहिती समोर आली आहे. या संदर्भातल पोलीस सह आयुक्त यांना पत्रही देण्यात आलं होतं. हे पत्र आता समोर आलं असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पत्रात म्हटलं होतं की, 4 एप्रिल रोजी मंत्रालयावर आणि 5 एप्रिल रोजी सिल्वर ओक, मातोश्री बंगला या ठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
इतकेच नाही तर, एसटी कर्मचाही हे खाजगी वाहनाने किंवा रेल्वेने येण्याची शक्यता आहे. खाजगी वाहने मुलुंड चेक नाका, वाशी चेक नाका आणि दहिसर चेक नाका येथून प्रवेश करणार असून त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात यावा असंही पत्रात म्हटलं होतं.
त्यासोबतच आंदोलक आझाद मैदान, मंत्रालय, मातोश्री बंगला, वर्षा बंगला, सह्याद्री अतिथीगृह, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी, सिल्वर ओक येथे आंदोलन कऱण्याची शक्यता आहे असंही पत्रात म्हटलं होतं.
सिल्वर ओक, मातोश्री बंगल्यावर आंदोलनाचा पोलिसांकडून आधीच अलर्ट देण्यात आला होता. 4 एप्रिलला अलर्ट देऊनही पोलिसांकडूनच दुर्लक्ष झालं का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण मिळालं. कथित एसटी कर्मचाऱ्यांनी राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी धुडगूस घातला होता तसेच प्रसार माध्यमांशी बोलत असताना “शरद पवारांच्या निवास स्थानी घुसून त्यांना जाब विचारणार” असा इशारा गुणरत्न सदावर्तें यांनी दिला होता.

No comments:

Post a Comment