वेध माझा ऑनलाइन - आयएनएस विक्रांत युद्धनौका संवर्धनासाठी जमा केलेल्या निधीत अपहार केल्याच्या आरोपावरून भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली तब्बल ५७ कोटींचा निधी सोमय्या पिता-पुत्रांनी जमा केला व हा निधी राज्यपाल कार्यालयात जमा न करता त्याचा अपहार केल्याचा आरोप सोमय्या पितापुत्रांवर होता. याच आरोपाखाली त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.याचबाबत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आयएनएस विक्रांत प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असताना सोमय्या यांचं अचानक गायब होणं चर्चेचा विषय ठरलं होतं.
माध्यमांमधून सोमय्यांवर टीकेची झोड उठत असतानाच व सोमय्या फरार झाल्याची चर्चा रंगली असतानाच किरीट सोमय्या आज मुंबईत दाखल झाले व माध्यमांसमोर त्यांनी प्रतिक्रियाही दिली. तत्पूर्वी, आजच मुंबई उच्च न्यायालयाने या आयएनएस विक्रांत प्रकरणात अटकेपासून संरक्षण देत सोमय्या यांना दिलासा दिला. प्रकरणाच्या सुनावणीपर्यंत सोमय्या यांना अटक करण्यात येऊ नये असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाच्या या दिलाश्यानंतर लगेच किरीट सोमय्या मुंबईत दाखल झाले. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे जाहीर आभार मानले. सोमय्या म्हणाले, कोर्टाने केवळ दिलासाच दिला नाही तर, या प्रकरणाशी संबंधित मी जे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित केले होते तेच प्रश्न कोर्टानेही मुख्यमंत्र्यांसाठी उपस्थित केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे काम फक्त माफियागिरी करणे, खोटे गुन्हे दाखल करणे, अटक करून जेलमध्ये टाकायची भाषा करणे हेच आहे. पण, ह्या गोष्टी महाराष्ट्र पहिल्यांदाच अनुभवत आहे. आयएनएस विक्रांत संवर्धन निधी संकलनामध्ये एक दमडीचाही गैरव्यवहार आम्ही केलेला नाही. जे काही आरोप झाले ते तथ्यहीन आणि विनापुरावा आहेत. स्टंटबाजी करायची आणि माध्यमांसमोर चर्चेत राहायचं एवढंच काम असल्याचा टोलाही सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला
किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेले होते. त्यांच्या अचानक बेपत्ता होण्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात पोस्टरबाजी करत सोमय्यांविरोधात आंदोलने केली, निषेध नोंदवले. यावर बोलताना सोमय्या म्हणाले, गेले चार पाच दिवस जे काही नाटक सुरु होते ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठरवल्याप्रमाणे सुरु होते. न्यायालयाच्या भावनेच्या विरुद्ध हे सर्व सुरु होते. तर, संजय राऊत हे केवळ प्रवक्ते असून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावणारे खरे मास्टरमाईंड हे उद्धव ठाकरेच असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.
No comments:
Post a Comment