वेध माझा ऑनलाइन - एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इफ्तारसाठी येण्याचे निमंत्रण दिलं.
यावेळी बोलताना जलील यांनी सांगितलं, राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभमीवर पोलिस कमिशनरांची भेट घेतली आहे. यावेळी आम्ही त्यांना कशा प्रकारे मदत करु शकतो किंवा आमची मदत हवी आहे का अशी विचारणा केली. तसंच या सभेदरम्यान आम्ही औरंगाबादमध्ये कशी शांतता राखू शकतो यासाठीही चर्चा केली असल्याचं जलील म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांनी राज यांना इफ्तारसाठी निमंत्रण दिलं. ते म्हणाले, राज ठाकरे साहेब येणार आहेत मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर त्यांची सभा होणार आहे. त्याआधी राज यांनी आमच्यासोबत इफ्तारसाठी यावे असंही ते म्हणाले.
तसंच या सभेनंतरही आपण सगळे हिंदू-मुस्लीम एकत्र राहू. जिल्ह्याला पुढे घेऊन जायच जर सगळ्यांनी ठरवलं तर कोणीही थांबवू शकत नाही. एक टक्केच लोक दंगा करत असतात, मात्र त्यासाठी पोलीस आहेत आपला पोलिसांवर विश्वास आहे. शिवाय पोलिसांनी लोकप्रतिनिधिंना हाताशी धरुन शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा असही ते म्हणाले. दरम्यान, भोंग्याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले, भोंग्यांच्या विषयाबाबत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी योग्य पद्धतीने खुलासा केला आहे. नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत, कोर्टाच्या नियमांप्रमाणे कारवाई व्हावी मात्र जोरजबरदस्ती करु नये असही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment