वेध माझा ऑनलाइन - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली. विशेष म्हणजे भाजपला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे. त्यासाठी दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. भाजपकडून वेगवेगळ्या माध्यमातून तशाप्रकारचे प्रयत्न करण्यात येत आहेत. पण राज्य सरकारकडून त्यांचा प्रयत्न उधळला जात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
"हे एक मोठं षडयंत्र आहे. सदावर्ते प्रकरणात सुद्धा हेच झालं आहे. राज्य उलथवायचं, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करायचा. नेत्यांच्या घरावर हल्ले करायचे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरावर प्रयत्न केला. मग शिवसैनिक प्रतिकार करतात. मग संघर्ष निर्माण करायचा. त्यातून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करायची. त्यांच्या मनाप्रमाणे एकदा घडलं की राज्यपाल त्यांचंच आहे. राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची. हे असे सगळे उद्योग सुरु आहेत. अर्थात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते हे राज्य पुढे नेत आहेत. त्यामुळे भाजपचा प्रत्येक कट उधळला जातोय", असा दावा संजय राऊतांनी केला.
No comments:
Post a Comment