वेध माझा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरापुढे हुनमान चालीसा पठण प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहे. ईडीने अटक केलेल्या युसुफ लकडवाला याच्याकडून नवनीत राणांनी 80 लाखांचे कर्ज घेतले, असा गंभीर आरोप पुराव्यासह शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून नवनीत राणा यांच्यावर आरोपाचा बॉम्ब फोडला आहे. नवनीत राणा यांनी युसुफ लकड़ावालाकडून 80 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. युसुफ लकडावाला याचा जेलमध्ये मृत्यू झाला आहे. याच लकडवालाला ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती, असा धक्कादायक खुलासा संजय राऊत यांनी केला आहे.युसुफ लकडावाला मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने अटक केली होती, त्यावेळी त्याचे डी गँग अर्थात अंडरवर्ल्डशी संबंध होते. मग या प्रकरणाची ईडी चौकशी करणार का? हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी पुराव्यासह फोटो सुद्धा ट्वीट केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नवनीत राणांवर होणार आणखी गुन्हे दाखल
दरम्यान, नवनीत राणा यांनी कोठडीत असताना आपल्याला दलित असल्यामुळे पाणी देण्यास नकार दिला असा गंभीर आरोप केला होता. या आरोपांमुळे राजकीय वाद पेटला आहे. पण, पोलीस आयुक्तांनी चहापान घेत असतानाचा व्हिडीओ समोर आणून राणा यांचा दावा खोडून काढला होता. पण, आता त्यांनी वापरलेले दलित कार्ड हे त्यांच्यावर उलटण्याची दाट शक्यता आहे.
नवनीत राणा यांचा पोलिसांविरोधात अँट्रासिटी केस दाखल करण्याचा प्लॅन केला होता. मात्र तो आता फेल जाताना दिसत आहे. तक्रार नोंदवणारे आणि तक्रार नोंदवून घेणारे अधिकारी एकाच प्रवर्गातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राणा यांच्या तक्रारीत खार पोलीस ठाण्यात चुकीच्या वागणुकीचा उल्लेख आहे. मात्र मध्यरात्री राणा या सांताक्रुझ पोलीस ठाण्यात होत्या. नवनीत राणा यांच्यावर पोलिसांची प्रतिमा मलिन करणे, पोलिसांवर खोटे आरोप करणे याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. गृह खात्याचा रिपोर्ट लवकरच लोकसभा सचिवांना पाठवण्यात येणार आहे. गृह खात्याच्या रिपोर्टनंतर नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे, नवनीत राणा यांना कोठडीत पाणी दिले होते पण त्यांनी ते पाणी घ्यायला नाकारले. त्यामुळे त्यांना बिसलरीचे पाणी, स्पेशल चहा आणि जेवणही दिले. राणा करत असलेल्या आरोपात तथ्य नाही. आमच्याकडे सांताक्रुझ पोलीस ठाणे आणि पोलीस कोठडीतले सीसीटिव्ही फुटेज आहेत, अशी माहितीही पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.
No comments:
Post a Comment