वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अटकेची कारवाई केली. सदावर्ते यांच्यासह ताब्यात घेतलेल्या शंभरहून अधिक आंदोलकांना आज (शनिवारी) मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सदावर्ते यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य १०९ संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी काल, शुक्रवारी शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. या आंदोलनावेळी काहींनी चपला भिरकावल्या. या आंदोलनात सहभागी झालेल्यांना सदावर्तेंनी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी काल संध्याकाळी सदावर्तेंना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांची चौकशी केल्यानंतर गुन्हा नोंदवून अटक केली. अटकेनंतर आज, शनिवारी सदावर्ते यांच्यासह ताब्यात घेतलेल्या शंभरहून अधिक आंदोलकांना किल्ला कोर्टात हजर केलं.
या प्रकरणावर किल्ला कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सरकारच्या वतीनं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. आरोपींवरील कलम गंभीर असून, त्यांना कोठडी द्यावी, अशी मागणी घरत यांनी केली. त्यानंतर कोर्टानं सदावर्ते यांच्यासह आंदोलक कर्मचाऱ्यांना कोठडी सुनावली.
अटक करण्यात आलेले आरोपी तपासात सहकार्य करत नाहीत असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. काल पवार यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी गेलेल्यांमध्ये खरोखरच एसटी कर्मचारी होते की काही भाडोत्री लोक यात घुसविण्यात आले होते, याचा तपास करण्यासाठी १४ दिवसांची कोठडी मिळण्याची मागणी त्यांनी केली.
No comments:
Post a Comment