Friday, April 15, 2022

हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन करत मनसे ला दिले राष्ट्रवादीने उत्तर...

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यात सध्या चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगल्याचं बघायला मिळतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जातीवादाचा आरोप करत सडकून टीका केली होती. याशिवाय राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना उत्तर म्हणून हनुमान चालीसाचे सामूहिक पठण करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात खालकर चौक मारुती मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी सामूहिक हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे. मनसेच्या या मोहिमेला आता राष्ट्रवादी काँग्रेसने अनोख्या पद्धतीने उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हनुमान जयंतीचा प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार आहे. पुण्यातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात आज संध्याकाळी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र माळवदकर आणि भाई कात्रे यांनी या रोजा इफ्चारचे आयोजन केलं आहे.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हिंदू समाजाकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तारचे आयोजन करण्यात आलं आहे, असं राष्ट्रवादीकडून सांगितलं जात आहे.
"इकडे मशिदीच्या भोंग्यावरुन हिंदू-मुस्लिम वाद पेटविण्याचा प्रयत्न होत असताना आम्ही सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी इफ्तारचं आयोजन केलं आहे. हिंदू-मुस्लीम समाज बांधव आहेत आणि त्यांच्यातील सामाजिक सौख्य कायम ठेवण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन केलं", अशी प्रतिक्रिया इफ्तारचे आयोजक रवींद्र माळवदकर यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या उपक्रमाला भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर टीका केली आहे. "नास्तिक शरद पवार यांच्या पक्षाकडून पुण्यातील साखळीपीर हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी ठेवणार आहेत. ही कोणत्या प्रकारची नास्तिकता आहे? हा सरळ हिंदू धर्माच्या श्रद्धेवर घाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर निषेध! समस्त हिंदूंनी याचा निषेध करावा", असं भाजपने ट्विटरवर म्हटलं आहे. "शरद पवारांनी त्यांच्या घरात मशिदीची स्थापना करून, त्यांची घरी इफ्तार पार्टीचं आयोजन करावं, हिंदूंच्या आस्थेवर घाला घालू नका. हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचा आयोजन करता तर मशिदीत हनुमान चालीसा लावून दाखवा", असाही घणाघात भाजपने ट्विटरवर केला आहे.

No comments:

Post a Comment