Sunday, November 20, 2022

कराडचे नगराध्यक्ष दिवंगत पी डी पाटील साहेबांना यशवंतराव चव्हाण साहेबांचे पत्र ;...

वेध माझा ऑनलाइन - स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी कराड नगरपालिकेचे तत्कालिन नगराध्यक्ष स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांना 16 मे 1961 साली एक पत्र लिहिले होते... आज कराड नगरपालिकेने ते पत्र प्रीतिसंगम घाटावरील स्वामींच्या बागेच्या प्रवेशद्वारावरच लावले आहे हे पत्र कराडकरांसाठी लक्षवेधी ठरत आहे... या पत्रावरील मजकुर कराडकर मोठ्या कुतूहलाने आवर्जून त्याठिकाणी थांबून वाचताना दिसत आहेत...

  चव्हाण साहेबांनी पी डी साहेबांना लिहिलेल्या या पत्रातील मचकुर असा की...
"कराडचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण प्रीतीसंगम... आधुनिक नगररचनेत अशा नद्यांच्या किनाऱ्यांची योजनापूर्वक बांधणी करून आकर्षक बगीचे, फिरण्याची सोय करण्याच्या कल्पनेस महत्त्वाचे स्थान दिले जावे... स्वामींच्या बागेची जागा ताब्यात घेऊन तेथे एक सुंदर संगम उद्यान बनवणे शक्य आहे... भुईकोट किल्ल्याच्या संगमा शेजारील तटावर दुरुस्ती करून संगमाचे पावसाळ्यातील अलौकिक स्वरूप पाहण्यासाठी आकर्षक व्यवस्था करणे जरूर आहे... आपण व्यक्तीश: प्रयत्न करून नगरपालिकेचे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधावे म्हणून मी हा प्रश्न या शहराचा एक नागरिक या नात्याने लिहीत आहे"...
दरम्यान, हे पत्र तत्कालीन नगराध्यक्ष स्वर्गीय पी डी पाटील यांना स्वर्गीय चव्हाण साहेबांनी लिहून  त्याठिकाणी उद्यान निर्मितीबाबतची इच्छा व्यक्त केली होती... पी डी साहेबांनी देखील ती इच्छा शिरसावंद्य मानून या विषयाला साक्षात साकारण्यासाठी प्रयत्न करत प्रीतिसंगम बाग निर्माण केली... त्यात कालांतराने स्थित्यंतर झाली असतील..., कदाचित काही बदलही झाले असतील... मात्र मूळ उद्यान हे चव्हाण साहेबांना अपेक्षित असेच ठेवण्याचा पी डी साहेबांचा प्रयत्न राहिला हे आजही स्पष्ट जाणवते आहे...चव्हाण साहेबांनी पी डी साहेबांना लिहिलेल्या या पत्रातून चव्हाण साहेबांचा पी डी साहेबांवरील अतूट विश्वास तर दिसतोच... मात्र पी डी साहेबांनी देखील चव्हाण साहेबांच्या विश्वासाला सम्पूर्ण न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचेही यातून दिसते... चव्हाण साहेबांचे व पी डी साहेबांचे एकमेकांशी असलेले राजकीय गुरू-शिष्याचे नातेदेखील यातुन अधोरेखित होत आहे आणि ही बाब यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहत नाही हेही तितकेच खरे ! 
दरम्यान चव्हाण साहेबांनी पाठवलेलं पत्र व त्या पत्राच्या प्रेरणेतून पी डी साहेबांनी त्यांच्या एका शब्दावर  साकारलेले येथील प्रीतिसंगम उद्यान म्हणजे सध्याच्या राजकारणापुढे ठेवलेला हा निष्ठेचा एक सुंदर आदर्शच म्हणावा लागेल...!

No comments:

Post a Comment