Tuesday, November 15, 2022

अबू आझमी यांच्याशी संबंधित तब्बल ३० ठिकाणी प्राप्तीकर विभागाच्या धाडी ; सहा शहरांमधील मालमत्तांवर धाडी...

वेध माझा ऑनलाइन -  आज दुपारच्या सुमारास अबू आझमी यांच्याशी संबंधित तब्बल ३० ठिकाणी प्राप्तीकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना सुरूवात झाली आहे. मुंबईसह देशभरातील एकूण सहा शहरांमध्ये या धाडी टाकण्यात आल्या आहेत.

अबू आझमी, त्यांचे निकटवर्तीय दिवंगत गणेश गुप्ता आणि त्यांच्या पत्नी आभा गणेश गुप्ता यांच्या काही मालमत्तांवर प्राप्तीकर विभागानं धाड टाकली आहे. बेहिशेबी मालमत्ता, गुंतवणूक आणि काळा पैसा यासंदर्भात या धाडी प्राप्तीकर विभागानं टाकल्याची माहिती समोर येत आहे. अबू आझमी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असताना आभा गुप्ता या पक्षाच्या सचिव होत्या.

सहा शहरांमधील मालमत्तांवर धाडी
या सगळ्या धाडींना आभा गुप्ता आणि अबू आझमी यांच्या कुलाब्यातील कमल मॅन्शनमधील कार्यालयांपासून सुरुवात झाली. देशभरातील एकूण ३० ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबईसह वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनौ या शहरांचा समावेश आहे.
वाराणसीमधील विनायक निर्माण लिमिटेड या कंपनीवर प्राप्तीकर विभागानं धाड टाकली आहे. आभा गुप्ता यांनी त्यांची बेहिशेबी मालमत्ता या कंपनीत गुंतवल्याचा प्राप्तीकर विभागाला संशय आहे. शिवाय, कोलकात्यामध्ये धाड टाकण्यात आलेल्या कार्यालयाच्या ऑपरेटरचा वापर हवाला मार्गाने पैशांचे व्यवहार करण्यासाठी केला जात असल्याचाही विभागाला संशय आहे. याशिवाय, वाराणसीमधील विनायक रिअल इस्टेट या कंपनीवरही प्राप्तीकर विभागाला संशय असल्याची माहिती इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.



 

No comments:

Post a Comment