वेध माझा ऑनलाइन - माजी मंत्री एकनाथ खडसे आणि विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्यातील शाब्दिक युद्ध संपताना दिसत नाही. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून महाजन-खडसे वाद पुन्हा उफाळून आला. हा वाद इतक्या टोकाला पोहचला की आता एकनाथ खडसेंच्या मुलाचं नेमकं काय झालं? ही हत्या होती की आत्महत्या हादेखील संशोधनाचा विषय आहे असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवचलं आहे. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांचा वाद वैयक्तिक पातळीवर पोहचल्याचं दिसून येत आहे.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही. मुली असणं सुदैवीच आहे. माझ्या मुली आहेत मला आनंद आहे. त्यांनाही एक मुलगा होता त्याचे काय झाले याचे उत्तरही खडसेंनी द्यावं. मला या विषयात बोलायचं नाही. परंतु ते माझ्या मुलाबाळांपर्यंत पोहचणार असतील तर त्यांच्या मुलाचं ३२ व्या वर्षी काय झालं? कशामुळे झाले? हा संशोधनाचा विषय आहे. मी अजून काही बोललो तर ते त्यांना झोंबेल
जिल्हा नियोजन बैठकीत गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे समोरासमोर आले होते. तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. या बैठकीनंतर एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या असा सवाल गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
खडसेंचा पलटवार
माझ्या मुलाची हत्या झाली की आत्महत्या याबाबत शंका असेल तर ते सत्तेत आहेत. त्यांनी चौकशी केली तर माझी हरकत नाही असं एकनाथ खडसेंनी पलटवार केला.
त्याचसोबत जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी घरात नव्हतो. रक्षा खडसे आणि दोघेच घरी होते. मग रक्षा खडसेंनी खून केला असे त्यांचे म्हणणं असेल तर त्याबाबत सीबीआयमार्फत चौकशी करावी. माझ्या अनेक प्रकरणाची चौकशी केली. कारण नसताना हे उद्योग चाललेत. माझी सीबीआय, अँन्टी करप्शन चौकशी सुरू आहे. मी ज्यांना मोठे केले त्याच माझ्यावर आरोप लावतायेत. दुर्दैवाने गिरीश महाजनांना मुलगा नसल्याने त्यांना माझे दु:ख कळणार नाही. घाणेरडे, नीच राजकारणात जायचं नाही. माझा एकुलता एक मुलगा गेला. त्यात असे आरोप करणे वेदनादायी आहे. कुणाचं व्यक्तिमत्व कसे आहे? मुलीबाळींशी कोण कसे वागतं हेदेखील सगळ्यांना माहिती आहे असं घणाघात एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर केला.
No comments:
Post a Comment