वेध माझा ऑनलाइन - काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेनिमित्त महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात असताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. भाजपने राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली, तर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा थांबवण्याची मागणी केली. मनसेनेही राहुल गांधींविरोधात आंदोलन केलं. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून भाजप, शिंदे गट आणि मनसेकडून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला. राहुल गांधींच्या या वक्तव्याशी सहमत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडी फुटू शकते, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे आशिर्वाद आहेत, तोपर्यंत महाविकासआघाडीला किंचितही धोका नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.
'मला सावरकरांविषयी बोलायचं नाही. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. राज्यात बरेच भीषण प्रश्न आहेत. राजकीय नेते, मीडिया यांनी कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायचं, हे ठरवलं पाहिजे. अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या गोष्टींबाबत, व्यक्तीचा उल्लेख करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करू नये,' अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.'या सरकारने महाविकासआघाडीच्या आमदारांच्या कामाला स्थगिती दिली आहे. या कामांना विधिमंडळाची मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे स्थगिती देणं योग्य नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनाही प्रत्येक भेटीत हे सांगितलं आहे. नव्या कामांना मंजुरी देण्याबाबत दुमत नाही, पण मागची कामं थांबवण्याचं काही कारण नाही. सत्ता कायम राहत नाही, हे लक्षात ठेवून विरोधकांना सापत्नभावाची वागणूक देऊ नये,' असा सल्ला अजित पवारांनी राज्य सरकारला दिला आहे.
No comments:
Post a Comment