वेध माझा ऑनलाइन - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदि यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. त्यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, छत्रपतींनी जर माफी मागितली तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन शिवरायांचा जयजयकार का करतात? भारतीय नौदलाला त्यांनी जे काय नवीन बोधचिन्ह दिलय, शिवाजी महाराजांच्या नौसेनेचं ते कशासाठी दिलं आहे? औरंगजेबाच्या आणि अफजलखानाच्या कबरी तोडण्याचे नाटक कशासाठी करत आहात? असे प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केले आहेत.
यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांवर टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना फोडली, ते स्वाभिमानाचं तुणतुणं वाजवत, स्वाभिमान… स्वाभिमान म्हणत भाजपसोबत गेले ना, मग आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? राज्यपाल आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर शिवाजी महाराजांचा अपमान करुन 72 तास झाले. तरीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि त्यांचे 40 लोक यावर साधा निषेधही करु शकले नाहीत. इतके तुम्ही घाबरत आहात? असा टोला राऊत यांनी लगावला.
No comments:
Post a Comment