Friday, January 7, 2022

आता राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत...राज्यभरात कडक निर्बंध लागणार असल्याची सूत्रांची माहिती...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रात कोरोनाचं पुन्हा एकदा थैमान सुरु झालं आहे. विशेष म्हणजे राज्यात आज दिवसभरात तब्बल 40 हजारांपेक्षा जास्त नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे ही परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये आणि कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात यावा, यासाठी प्रशासनासह राज्य सरकार कामाला लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्यात सध्याची परिस्थिती बघता लॉकडाऊन  लागतं की काय? अशा विचारांनी सर्वसामान्यांमध्ये धडकी भरत आहे. कोरोनाच्या याआधीच्या दोन लाटांमध्ये राज्यातील जनता आणि सरकारने लॉकडाऊनची खूप मोठी झळ सोसलेली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा निर्णय घेणे सरकारसाठी खूप कठीण आहे. त्यामुळे सरकार सध्याची परिस्थिती पाहता राज्यभरात कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आज दिवसभरात मॅरेथॉन बैठकादेखील झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार

महाराष्ट्राचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी आज राज्यातील 6 विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्या-त्या भागातील कोरोना परिस्थिती आणि नवे निर्बंध काय लावता येतील या विषयी चर्चा झाली. विशेष म्हणजे या बैठकीनंतर विभागीय आयुक्तांनी सर्व विभाग जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकांमध्ये नेमक्या काय-काय मुद्द्यांवर चर्चा झाली. परिस्थिती बघून काय निर्णय घेता येतील, याबाबतचा अहवाल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादर होणार आहे.

नव्या नियमावलीत काय बदल असण्याची शक्यता?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधितांचा वाढता आकडा बघता सरकार नव्या निर्बंधांवर त्वरीत निर्णय घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विकेंडसाठी काहीतरी नवी नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. तसेच हॉटेल्स-व्यवसायबाबत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच बाजारपेठेतील दुकानं अल्टरनेट डे सुरू ठेवण्याबाबतही प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री संपूर्ण अहवाल वाचून योग्य निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment