Saturday, April 2, 2022

पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला मोठा धक्का ; शिवाजीराव नाईक यांची भाजपला सोडचिठ्ठी ; हजारो कार्यकर्त्यांसह केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश ;शरद पवार यांच्या उपस्थितीत केली घरवापसी...

वेध माझा ऑनलाइन - पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. आज माजी मंत्री आणि शिराळा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते शिवाजीराव नाईक यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवाजीराव नाईक यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत घरवापसी केली आहे.

'प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार श्रीनिवास पाटील यांचीही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. भाजपमध्ये असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी योग्य न्याय दिला नसल्याचा आरोप करत त्यांनी भाजपला रामराम केला आहे. नाईक यांच्या प्रवेशामुळे सांगलीत राष्ट्रवादी भक्कम होणार आहे तर भाजपला भगदाड पडणार आहे, हे निश्चित.

2019 च्या निवडणुकीत शिराळा मतदारसंघात शिवाजीराव नाईक यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत नाईक यांना ७६,००२ इतकी म्हणजे ३३ टक्के मते पडली होती. चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच शिराळ्यात आपला हा पराभव झाल्याचा आरोप शिवाजीराव नाईक यांनी केला होता. भाजप प्रदेशाध्यक्षांचं धोरण हे एकाला जवळ करायचं आणि दुसऱ्याला त्रास देत खेळ्या करत राहायचं, असं असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
नाईक यांनी असंही म्हटलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रकांत पाटलांचा वेगळा हेतू आहे, मात्र त्याचा परिणाम आम्हाला इथे सहन करावा लागला. वेगळ्या खेळ्या करून त्यांनी हेतू पुरस्कर भाजप कार्यकर्त्यावर अन्याय केला. त्यांच्याकडून ज्या पद्धतीची वागणूक हवी होती, ती मिळाली नाही. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहोत.

No comments:

Post a Comment