वेध माझा ऑनलाइन - कृष्णाकाठच्या आर्थिक समृद्धी आणि संपन्नतेसाठी कृष्णा आर्थिक परिवार सातत्याने प्रयत्नशील राहिला आहे. या आर्थिक परिवारात ‘वित्तपेटा’ या नव्या निधी संस्थेची भर पडली असून, या संस्थेच्या कराड येथील दत्त चौक परिसरातील पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते आणि कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. सुरेश भोसले म्हणाले, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अनेक वर्षांपासून बँकिंगची संकल्पना अस्तित्वात आहे. बँकिंगच्या माध्यमातून सर्वच भागातील लोकांची व उद्योग - व्यवसायांची मोठी आर्थिक प्रगती झाली आहे. वित्तपेटा निधी संस्थेच्या स्थापनेमुळे कृष्णाकाठच्या लोकांच्या आर्थिक प्रगतीत भर पडण्यास निश्चितच मदत होणार आहे.
डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, ग्रामीण भागासह शहरातील उद्योजकांना सुलभपणे कर्जपुरवठा व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसार देशभर निधी संस्थांचे जाळे विस्तारत आहे. याच उद्दिष्टासाठी कृष्णा आर्थिक परिवाराच्या माध्यमातून वित्तपेटा निधी संस्थेची स्थापन करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या आर्थिक वर्षात कृष्णा आर्थिक परिवाराने एकत्रित ११६० कोटी हून अधिक व्यवसाय केला असून, या वर्षांत १८.३ टक्के व्यवसाय वाढ झाली आहे. वित्तपेटा निधी संस्थेमुळे या व्यवसायवाढीला चालना मिळेलच; शिवाय ग्राहकांना कमीत कमी वेळेत कर्ज आणि युवकांसाठी रोजगाराची संधीही उपलब्ध होणार आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या ग्राहकांना ठेव पावत्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सयाजी यादव, कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष अशोकराव थोरात, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, मुकुंद चरेगावकर, ‘म्हाडा’चे माजी संचालक मोहनराव जाधव, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबा गावडे, कराडचे माजी विरोधी पक्षनेते महादेव पवार, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, कृष्णा बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे चेअरमन सचिन तोडकर, उमेश शिंदे, संतोष हिंगसे, सौ. सारिका गावडे, गजेंद्र पाटील, धनाजी जाधव, नारायण शिंगाडे, रमेश मोहिते, व्यवस्थापक सुजीत माने यांच्यासह नागरिक व ग्राहक उपस्थित होते. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. महादेव पवार यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment