Thursday, June 30, 2022

एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड ; उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचा आपल्याला आनंद नाही ; गोव्यात दिली प्रतिक्रिया...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड केली आहे. एकनाथ शिंदे यांनीच गोवा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे मुंबईसाठी रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे मुंबईत येऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. याआधी गोवा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचा आपल्याला आनंद नाही असंही सांगितलं.

गोव्यात बंडखोर आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीसंबंधी विचारलं असता एकनाथ शिंदे यांनी बैठकीत शिवसेना पक्षाचा गटनेता म्हणून माझी निवड झाली असल्याचं सांगितलं. “सरकार स्थापनेसंदर्भातील पुढील प्रक्रियेसाठी सर्व ५० आमदारांनी मला अधिकार दिले आहेत. मुंबईत गेल्यानंतर पुढील रणनीती ठरवणार आहे. मी परत गोव्याला येणार आहे,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्याचा आम्हाला आनंद नाही. जी परिस्थिती उद्भवली होती त्यात सर्व ५० आमदारांची एकच मागणी होती. आमदारांना मतदारसंघात काही प्रश्न, अडचणी होत्या. वाईट अनुभव येत होते. तेव्हा आपण बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाऊयात अशी सर्व ५० आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी होती. वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. आम्हाला कोणालाही आनंद नाही. उद्धव ठाकरेंबद्दल आमच्या मनात कालही आदर होता आणि आजही आहे”.

No comments:

Post a Comment