Wednesday, June 29, 2022

औरंगाबादच नामकरण संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचं धाराशीव नामकरणास मान्यता ; ठाकरे सरकारचा कॅबिनेटमध्ये निर्णय...

वेध माझा ऑनलाइन - राज्य मंत्रिमंडळात आज खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. औरंगाबाद शहराचा नामकरणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. भाजप आणि मनसेकडून नामकरणाच्या मुद्द्यावरुन अनेकदा महाविकास आघाडी सरकारला घेण्यात आलं आहे. त्यामुळे अखेर महाविकास आघाडी सरकारकडून याबाबतचा आज निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या 50 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे हे सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने औरंगाबाद नामकरणाचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे फक्त औरंगाबादच नाही तर उस्मानाबाद शहराचं देखील धाराशीव नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारचे महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सर्वात मोठे निर्णय मानले जातील.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून भावनिक विधान केलं. "तुम्ही जे सहकार्य केले त्यासाठी धन्यवाद! आता जी कायदेशिर प्रक्रिया त्याला सामोरे जाऊ. मला माझ्याच लोकांनी धोका दिला म्हणून सध्याची परिस्थिती निर्माण झाली. या अडीच वर्षात तुम्ही सहकार्य केलं. माझ्याकडून कुणाचा अपमान झाला असेल, किंवा कुणी दुखावले असतील तर मी माफी मागतो", असं मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांना कॅबिनेट बैठकीत म्हणाले.

No comments:

Post a Comment