Monday, June 27, 2022

वेध माझा ऑनलाइन -  धावरवाडी येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याला ‘साऊथ आफ्रिकन फार्मर्स डेव्हलपमेंट असोसिएशन’चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. सियाबोंगा मदलाला यांच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेतील ८ जणांच्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या भेटीत त्यांनी जयवंत शुगर्समधील विविध उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांना भेट देऊन, शेतकऱ्यांशी चर्चा केली.

महाराष्ट्राप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेतही वर्षातून केवळ ५ ते ६ महिनेच ऊस गाळप हंगाम सुरू असतो. पण तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच भिन्न स्वरूपाची आहे. तेथील  शेतकऱ्यांकडे प्रत्येकी १ ते २ हेक्टर इतके शेतीक्षेत्र असून, साखर कारखानेही १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढून, पुरेसे उत्पन्न मिळत नाही. दक्षिण आफ्रिकेतील जवळपास २०,००० शेतकऱ्यांनी एकत्र येत, ‘साऊथ आफ्रिकन फार्मर्स डेव्हलपमेंट असोसिएशन’ची स्थापना केली आहे. ऊसाचे उत्पादन वाढविण्याबरोबरच साखरेसह अन्य कोणकोणत्या उपपदार्थांचे उत्पादन घेता येईल आणि हे उपपदार्थ निर्मिती प्रकल्प कसे साकारता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी या संघटनेचे सदस्य असलेल्या ८ जणांच्या शिष्टमंडळाने जयवंत शुगर्सला भेट दिली. 

जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे यांनी या शेतकऱ्यांचे स्वागत करून, संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत शुगर्समध्ये सुरू असलेल्या उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली. साखरेच्या हंगामाशिवाय इतरवेळी वर्षभर इथेनॉल उत्पादनासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या ‘बायोसिरप’ या नव्या शाश्वत तंत्रज्ञानाची निर्मिती जयवंत शुगर्सने नुकतीच केली आहे. या प्रकल्पालाही शिष्टमंडळाने भेट दिली. तसेच ऊसभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी सौरभ कोकीळ (धामणेर), चंद्रकांत यादव (सासपडे), अनिल गायकवाड (इंदोली), राजेंद्र मोहिते (रेठरे बुद्रुक), संभाजी भोसले (खोडशी) यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी पुणे येथील प्राज इंडस्ट्रीजचे मकरंद जोशी, जयवंत शुगर्सचे सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment