वेध माझा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तेच्या महानाट्यावर आज पडदा पडणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनीच यासंदर्भातले सूतोवाच केले असून त्यामध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. दीपक केसरकर यांनी टीव्ही ९ शी बोलताना उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे. आजही आम्ही परत यायला तयार आहोत, उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यावा, असं केसरकर म्हणाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी तोडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची अट बंडखोर आमदारांनी घातली आहे
बंडखोरी केल्यामुळे एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी या आमदारांचा ‘गद्दार’ म्हणून देखील उल्लेख केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला गद्दार म्हणण्याचा एकाही शिवसैनिकाला अधिकार नाही. आम्ही हे वारंवार सांगितलं आहे. मी आजही सांगतो की अजूनही निर्णय द्या, आमची परत यायची तयारी आहे. २०-२१ आमदार आमच्या संपर्कात आहेत असं उगाच सांगू नका. एक-दोन लोकांची नावं सांगा, त्यांनाही मुंबईत आणून पोहोचवतो. आम्ही मांडलेली भूमिका शिवसेनेच्या हिताची आहे. किती वेळा हात जोडायचे यालाही मर्यादा आहेत”, असं केसरकर म्हणाले.
अल्टिमेटम!
दरम्यान, यावेळी बोलताना दीपक केसरकरांनी अप्रत्यक्षपणे या सगळ्या गोंधळाचा आज शेवटचा दिवस असल्याचा अल्टिमेटम उद्धव ठाकरेंना दिला आहे. “आज माझ्या दृष्टीने शेवटचा दिवस आहे. आमच्या पक्षप्रमुखांचं आज जे स्थान आहे, त्यांचा मान राखून राज्यात काहीतरी चांगलं घडलं पाहिजे अशी इच्छा होती. पण ते आपल्या विचारांशी ठाम आहेत. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच जायचं आहे. त्यामुळे आजचा हा कदाचित शेवटचा दिवस असेल जेव्हा मी हे आवाहन करू शकेन”, असं केसरकर म्हणाले.
No comments:
Post a Comment