Sunday, May 7, 2023

"राष्ट्रवादी' फुटणार! "सामना' तून पुन्हा दिले संकेत...!

वेध माझा ऑनलाइन ; सामनामधून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. 'भारतीय जनता पक्षाला लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकायच्या नाहीत, तेवढी त्यांची कुवत नाही, तर विरोधकांची बलस्थाने फोडून व ती फोडण्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून त्यांना राजकारण करायचे आहे. शंभर दिवस शेळी बनून जगायचे की एक दिवस वाघ बनून जगायचे याचा विचार भाजपसाठी बॅगा भरणाऱ्या प्रत्येकानं करायला हवा. उद्धव ठाकरे यांनी लढण्याचा निर्धार केला आहे. शरद पवार यांनी अखेरपर्यंत लढू असे सांगितले. हे झाले महाराष्ट्राचे, पण लालू यादव, के. सी. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन हे नेतेही लढायला उतरले आहेत हे महत्त्वाचे. कार्यकर्ते लढतच असतात. बॅगा भरून जे निघाले त्यांच्यावर पक्ष उभा नसतो', असं सामनामध्ये म्हटलं आहे.

पुढे अग्रलेखात म्हटलं आहे की, 'शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा 'प्लान' होता. लोक बॅगा भरून तयारच होते. व येणाऱ्यांच्या 'लॉजिंग -बोर्डिंगची' व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा प्लान कचऱ्याच्या टोपलीत गेला. व त्यांची पोटदुखी वाढत गेली. पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या तंबूत न्यावा व आपल्या सहकाऱ्यांची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या छळातून सुटका करावी, असा एका गटाचा आग्रह होता. पण पवारांनी तसे करण्यास नकार दिला, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
आपल्याभोवती वावरणाऱ्यांची मने नेमकी कोठे फिरत आहेत, याचा अंदाज पवारांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ज्यांना जायचे आहे, त्यांनी जावे त्यांना थांबवणार नाही, असे श्री पवारांनी सांगितले. म्हणजेच लोक जाणार होते किंवा तूर्त थांबले आहेत. भाजपच्या लॉजिंग - बोर्डिंगमधले बुकिंग अद्यापि रद्द झालेले नाही हे स्पष्ट आहे. जे जातील त्यांची राजकीय कारकीर्द लोकच संपवतील मग तो कितीही मोठा सरदार असो असा इशाराही सामनामधून देण्यात आला आहे.




No comments:

Post a Comment