वेध माझा ऑनलाइन । महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात अजूनही पक्षातील नेत्यांमध्ये खदखद कायम आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने पुन्हा एकदा दिल्लीत जाऊन हायकमांडची भेट घेतली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस वाचवायची असेल तर नाना पटोले यांना पदावरुन हटवा अशी मागणी या नेत्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. तर काँग्रेस कार्यसमितीची येत्या 8-10 दिवसांत रचना करण्यात येणार आहे. यानंतर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन’ करण्याचे संकेत दिल्लीतील बड्या नेत्याने दिल्याचे समजते.
महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवर सुनील केदार शिवाजीराव मोघे आणि संजय निरुपम या नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. मात्र सोनिया गांधी यांची भेट झाली नसल्याचे समजते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधिमंडळातील पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासारखे बरेच नेते अलिप्त असल्यासारखे आहेत. या नेत्यांनाही सक्रिय केल्यास पक्षाला त्याचा लाभ होईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, नाना पटोले यांच्यासंदर्भात हायकमांडकडे तक्रार करण्याची काँग्रेस नेत्यांची ही पहिलीच वेळ नाही. तर या आधीही महाराष्ट्रातील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी नाना पटोले यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे. त्यांनी पटोले यांना हटवण्याची मागणी केली आहे.
आशिष देशमुख यांनी देखील नाना पटोले यांच्यावर आरोप केले होते.त्यानंतर देशमुख यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली. पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यात यावं
अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसमधून जोर धरु लागली आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment