वेध माझा ऑनलाइन। मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल मध्यरात्री भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही भेट झाली. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र आगामी मुबंई महापालिकेची निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती. त्यानंतर मध्यरात्री फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
पुन्हा मनसेसोबत युतीच्या चर्चेला उधाण
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि भाजप व शिवसेना शिंदे गट यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकीसाठी युतीमध्ये मनसे देखील सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. तर राज ठाकरे यांनी देखील शिंदेंची भेट घेतली आहे.
काल फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मध्यरात्री फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा मनसेसोबतच्या युतीच्या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाच्या नेत्याकडून मनसेसोबतच्या युतीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.
No comments:
Post a Comment