Wednesday, May 3, 2023

कराडमध्ये बहरणार पुस्तकांची बाग : यशवंतराव चव्हाण वाचन चळवळीचा उपक्रम ;

वेध माझा ऑनलाइन ; माजी नगरसेवक आणि शहरात कल्पकतेने विविध उपक्रम राबवणारे सौरभ पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी मुलांमध्ये वाचन संस्कृती जोपासली जावी, या हेतुने यशवंतराव चव्हाण वाचन चळवळीचा शुभारंभ केला होता. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या चळवळीचा एक भाग म्हणून सद्याच्या उन्हाळी सुट्टय़ांमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनच्या आवारातील मोकळय़ा जागेचा वापर करत तेथे पुस्तकांची बाग साकारली आहे. या बागेत पुढील दीड महिना मुलांना मोफत वाचनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सौरभ पाटील यांनी केले आहे.

कराडचे सुपूत्र यशवंतराव चव्हाण हे राजकारणी त्याचबरोबर उत्कृष्ट साहित्यिक होते. त्यांचे साहित्यप्रेम मोठे होते. ते उत्कृष्ट वाचकही होते. त्यांच्याच नगरीत वाचन चळवळ वाढीस लागावी, या हेतुने तीन वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण वाचन चळवळीचा शुभारंभ करण्यात आला होता. मुले खेळत नाहीत, वाचत नाहीत, त्यांच्या हाती सतत मोबाईल असतो, अशी तक्रार पालक करत असतात. त्यामुळे वाचन चळवळ वाढीस लागण्याच्या हेतुने हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत नोंदणी करणाऱया पाचवी सहावी सातवी च्या विद्यार्थी विद्यार्थिनींना वर्षभरासाठी नगरवाचनालयातून पुस्तके वाचनासाठी घेऊन जाता येत होती. या उपक्रमास वाढता प्रतिसाद मिळत यावर्षी सुमारे 2500 मुलामुलींनी नोंदणी केली आहे.
सद्या उन्हाळी सुट्टय़ा सुरू असून मुलामुलींचा कल आता शिबिरांकडे आहे. यातूनच त्यांच्यासाठी पुस्तकाची बाग साकारण्याची संकल्पना सौरभ पाटील यांना सुचली. त्यांनी नगरपालिकेचे सहकार्य घेत ही अभिवन बाग यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनच्या उत्तर-पश्चिम कोपऱयात साकारली आहे. या जागेतील गवत काढून तेथे मुलांना बसण्यासाठी कट्टे बांधण्यात आले आहेत. आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. पुस्तकांची बाग असे रेखाटन करण्यात आले आहे. येथील झाडांवर वाचनालयातील बालसाहित्याचे फोटो लावण्यात आले आहेत. आकर्षक चित्रेही ठेवण्यात आली आहे. मुलांना रमणीय परिसर करण्यात आला असून त्यासाठी अक्षरगुरू राहुल पुरोहित यांचे मार्गदर्शन लाभले आहे.  
5 मे ते 15 जून या कालावधीत येथे पुस्तकांची बाग हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आपले ओळखपत्र घेऊन नगरवाचनालयात द्यावे. तेथून आवडते पुस्तक घेऊन पुस्तकांच्या बागेत सकाळी 8 ते 10 या वेळेत वाचावे. जाताना पुस्तक परत देऊन ओळखपत्र घेऊन जावे, अशी संकल्पना आहे. गुरुवार दि 4 मे २०२३ रोजी सायंकाळी 5 वाजता कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंतकाका पाटील यांच्या हस्ते या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे.  
पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यावे

पुस्तकांची बाग हा उपक्रम पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे यात सहभागी होण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यावे. या बागेत घेऊन यावे. सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुलांसाठी विशेष शिबिर घेण्याचा मानस आहे.
सौरभ पाटील, माजी नगरसेवक

No comments:

Post a Comment