Tuesday, April 5, 2022

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत असल्याची राजू शेट्टी यांची घोषणा ;

वेध माझा ऑनलाइन - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर नाराज होते. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन त्यांनी आपली खदखद अनेकदा बोलून सुद्धा दाखवली होती. त्यानंतर आज कोल्हापूर येथील सभेत राजू शेट्टी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी जाहीर सभेत केली आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक होणार असेल तर आम्ही आमची भूमिका घेऊन इथून पुढे वाटचाल करणार आहोत असा निर्णय कुठेतरी घ्यावा लागेल. आज सकाळपासून झालेल्या चर्चेचा सार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज मी तुमच्या सर्वांच्या वतीने जाहीर करतो की, महाविकास आघाडी सरकारचे आणि आमचे सर्व संबंध संपले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज कोल्हापुरात पार पडली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना जाहीर सभेला संबोधित करताना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
राजू शेट्टी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याची चर्चा होती. राजू शेट्टी यांनी काही महिन्यांपूर्वी महापूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी पंचगंगा परिक्रमा यात्रा काढली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते आश्वासन पाळलं गेलं नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांचा आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावा यासाठी राजू शेट्टी संघर्ष करत आहेत.

याशिवाय भूमीअधिग्रहन कायदा, एफआरपी दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय हे महाविकास आघाडी सरकारने घेतले आहेत. हे निर्णय शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांना ते रुचलं नाही आणि आज अखेर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment