Wednesday, April 6, 2022

शरद पवार मोदी भेट...25 मिनिटे झाली खलबते...

वेध माझा ऑनलाइन - राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा कायम आहे. आगामी स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने भाजप आणखी आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे, दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदि यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नवी दिल्लीत एकीकडे तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही, असं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

विशेष म्हणजे, भाजपचा आज पक्ष स्थापन दिवस आहे. त्यामुळे सकाळपासून पंतप्रधान मोदी कार्यक्रमात व्यस्त होते. याच व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांना भेट दिली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आहे.

विशेष म्हणजे, पाच राज्यात निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काही नेते केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करत असताना अडथळा आणतात आणि दबाव आणण्याचे काम करत आहे, असं वक्तव्य करून घोटाळेबाजांना इशारा दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी राज्यात ईडी आणि आयकर विभागाच्या कारवायांना वेग आला होता. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक जेलमध्ये आहे तर अनिल देशमुख यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे अशा या वातावरणात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यामुळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

विशेष म्हणजे, शरद पवार यांनी आधी सर्व आमदार आणि खासदारांची बैठक घेतली होती. या वेळी संजय राऊत सुद्धा उपस्थितीत होते. आमदार आणि खासदारांसोबत चर्चेनंतर आज शरद पवार पंतप्रधानांच्या भेटीला पोहोचले. या भेटीत काय  चर्चा झाली, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

No comments:

Post a Comment