वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील अनेक ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने बऱ्याच ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान विभागाने आज (22 जुलै) बऱ्याच भागांना हायअलर्ट दिला आहे. पूर्व विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडाऱ्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विदर्भाला पावसाने झोडपून काढलं
आज नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. पालघर जिल्ह्यात पावसाने सलग चार दिवस दमदार हजेरी लावली. आजही येथे सकाळपासूनच रिमझिम सुरू आहे.
काल 21 जुलैरोजी डहाणू शहरामध्ये सर्वाधिक 315 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर तलासरी तालुक्यालाही पावसाने झोडपून काढलं. तलासरी तालुक्यातील कोमगाव येथून वाहणाऱ्या गावघात नदीला पूर आल्यामुळे या पुरात एक महिला वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. याचसोबत सूर्या आणि वैतरणा नद्यांनाही मोठा पूर आला आहे.
कोल्हापुरात प्रशासन सतर्क, पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ
भंडारा जिल्ह्याला देखील पावसाने झोडपून काढलं आहे. आसगावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे घरात अनेक लोक अडकली आहेत. घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याकरिता जिल्हा शोध आणि बचाव पथक आसगाव येथे पोहोचलेला आहे. आज भंडारामधील शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.
कोल्हापूरमध्ये तर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. येथील पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 38 फूट 10 इंच इतकी पोहोचली आहे. जिल्ह्यातील 84 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे येथील गावांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. एकंदरीत पाहता राज्यात मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
No comments:
Post a Comment