Wednesday, July 31, 2024

पश्चिम महाराष्ट्रात कोंग्रेसने दिली टोल विरोधी आन्दोलनाची हाक ; 3 ऑगस्ट रोजी होणार भव्य आंदोलन कोंग्रेस नेते सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण,आमदार विश्वजीत कदम होणार सहभागी ; काय आहे बातमी...?

वेध माझी ऑनलाइन।
काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. टोल माफ व्हावा, टोलमध्ये सवलत मिळावी यासाठी मोठं आंदोलन उभं केलं जाणार आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या  दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने येत्या शनिवारी 3 ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बडे नेते एका एका टोल नाक्यावर उभं राहून, आंदोलन करणार आहेत. आपआपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे नेते आंदोलनात उतरतील. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. 

काँग्रेसकडून टोल नाका परिसरात चक्काजाम करण्याचं नियोजन आहे. चक्काजाम आंदोलन करून वाहने विना टोल सोडली जाणार आहेत. शनिवारी सकाळी दहा वाजता पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात कोल्हापूरसह पेठनाका, कराड , सातारा, खेड शिवापूर  येथील टोलनाक्यावर आंदोलन केलं जाणार आहे.  रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने आणि दुरावस्था झाल्याने काँग्रेसने या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,आमदार विश्वजीत कदम , काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत.

कोणत्या नेत्याकडे कोणत्या टोलची जबाबदारी?

कोल्हापूरच्या किणी टोल नाका येथे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते थांबून आंदोलन करणार आहेत. सातारा जिल्ह्यातील तासवडे टोल नाका येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली आणि कराडमधील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील.  सातारा जवळच्या आनेवाडी टोल नाक्यावरती सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील.  पुण्यातील खेड शिवापूर या टोलनाक्यावर काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील.

No comments:

Post a Comment