Thursday, July 18, 2024

कराड शहराच्या पाणी प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी आज कराड नगर पालिकेच्या सभागृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अधिकारी आणि नागरिक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच कराड शहरातील पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत न झाल्यास रास्तारोको करून कराडमध्ये येणारी सर्व वाहतूक रोखण्याचा इशारा यावेळी संतप्त नागरिकांनी दिला आहे.

कराड पालिकेत आज पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीस प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, मुख्याधिकारी शंकर खंदारे, ए. आर. पवार यांच्यासह कराड शहरातील नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज पार पडलेल्या या बैठकीत कराड शहरातील पाणी प्रश्नाबाबत अनेक नागरिकांनी आपली मते मांडली. यावेळी कराड शहरातील पाणी पुरवठ्यासह दुरुस्तीचा प्रश्न चार ते सहा तासात मार्गी लावणार असल्याचे आश्वासन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिले. यावेळी प्रांताधिकारी म्हेत्रे म्हणाले की, नदीतील ज्या पाईपलाईन वाहून गेलेल्या आहेत. त्या ठिकाणची पाहणी करण्यात आलेली आहे. वाहून गेलेली पाइपलाइन पूर्ववत करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील बोलवण्यात आलेले आहे. लवकरच कराडला पोहचून अधिकारी संबंधित ठिकाणांची पाहणी करणार आहेत.

कराड पालिका प्रशासनाने महामार्ग देखभाल विभाग, डी. पी. जैन कंपनीला सोबत घेऊन पाणीपुरवठा पूर्ववत करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. तसेच समाजास्याने जर हा प्रश्न मार्गी लागला नाही, तर नाईलाजाने प्रशासनास यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल. जो कोणालाही परवडणार नाही, असा इशारा प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी यावेळी दिला.
यावेळी सुभाषकाका पाटील यांनी वाहून गेलेली पाइपलाइन तात्काळ पूर्ववत करणे गरजेचे आहे. यासाठी लागणाऱ्या खर्चामध्ये नगरपालिका एकही पैसा घालणार नसल्याचे सांगितले. यावेळी कराड शहरातील काही नागरिकांनी पाण्याच्या पाईपलाईन वाहून गेल्याने त्यानंतर उध्दभवलेल्या अनेक समस्या प्रशासनासमोर उपस्थित केल्या. तसेच यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली.

No comments:

Post a Comment