वेध माझा ऑनलाइन।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक वेळा मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली. ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत आणि सध्या त्यांची उपमुख्यमंत्रीपदाची पाचवी टर्म आहे. यासंदर्भात त्यांनीही यापूर्वी जाहीरपणे मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. किती वेळ उपमुख्यमंत्री राहणार? मुख्यमंत्री केव्हा होणार? असा प्रश्न त्यांनाच पडला आहे. अजित पवार यांच्याप्रमाणे त्यांच्या समर्थकांनाही दादांनी मुख्यमंत्री व्हावे, अशीच मनोकामना केली आहे. यामुळेच पिंपरी-चिंचवडमधील अजित पवार यांच्या समर्थकांनी अनोखा केक आणला. अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अजित पवार यांनीच हा केक कापला. या केकवर लिहिले होते, “मी अजित आशा- अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”, आता या केकची चांगली चर्चा पुणे शहरात रंगली आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केला. शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेत त्यांनी जवळपास ४० आमदारांसह पक्षावर दावा केला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची संधी असूनही शरद पवार यांनी ती घेऊ दिली नाही, असे जाहीरपणे म्हटले. तसेच आता उपमुख्यमंत्री म्हणून किती वेळ काम करायचे. माझी ही पाचवी टर्म आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहण्याचा माझा विक्रम झाला आहे, असे अजित पवार यांनी म्हटले होते.
No comments:
Post a Comment