Sunday, July 28, 2024

पावसाने घेतली विश्रांती ; तरी धोका कायम !


वेध माझा ऑनलाइन।
मुंबई, पुणे, रायगड, कोल्हापूर येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. या भागांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. सध्या पावसाने जरा विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर आता ओसरला आहे. मात्र, धोका अजूनही कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

आज ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, विदर्भातील अमरावती जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी आज हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आज कोकणसह विदर्भात बऱ्याच ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रायगड जिल्हा, पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. याचबोरबर मुंबई, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुणे , सातारा व कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यात 1 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात आज 29 जुलैपासून 1 ऑगस्टपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, पुणे आणि परिसरासाठी पुढील पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तर आज घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने घाट क्षेत्रासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment