Thursday, July 25, 2024

उद्या शुक्रवारी जिल्ह्याला रेड अलर्ट ;पाटण, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातील सुमारे 700 ते 800 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात येणार;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यात ही पाऊस पडत आहे. तर पश्चिम भागातील जावळी, पाटण, सातारा, महाबळेश्वर, वाई, जावळी तालुक्यात संततधार सुरू आहे. तर उद्या शुक्रवारी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. रेड अलर्ट दिल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्यांना शुक्रवार, दि. 26 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातील दरड प्रवण गावातील सुमारे 700 ते 800 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात येत आहे.

सातारा तालुक्यातील कण्हेर धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे. आज, गुरूवारी दुपारनंतर धरणाचे वक्र दरवाजे उचलून ५ हजार क्यूसेक वेगाने पाणी विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर म्हसवे पूल – करंजेकडून म्हसवे जाणारा तसेच हमदाबाज पूल हमदाबाज कडून किडगावकडे जाणारा या रस्त्यावरुन प्रवास न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बोगदा ते परळी रस्त्यावर भोंदवडे गावाजवळ रस्त्यावरच मोठे झाड पडल्याने काहीकाळ वाहतूक खोळंबली होती. प्रशासनाने तातडीने दखल घेत झाड बाजूला केल्यानंतर सुमारे एक तासाने वाहतूक सुरळीत झाली.
तर कोयना धरणातील पाणीसाठा 77.70 टीएमसीवर पोहोचला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत कोयना धरण 73.82 टक्के भरले होते. धरणात 85 हजार 035 क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. तर कोयनेच्या 60, नवजामध्ये 55 आणि महाबळेश्वरमध्ये 60 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.


No comments:

Post a Comment