वेध माझा ऑनलाइन - देशातील राज्यसभा आणि राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकांवरुन राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहेत. यातच महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोप तीव्र होत आहेत. यातच आता भाजप खासदार असलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरून खरपूस समाचार घेतला आहे. आमच्याबद्दल वाईट बोलाल, तर आम्ही शांत बसणार नाही, असे इशारा उदयनराजेंनी दिला आहे.
अलीकडेच शिवेंद्रसिंहराजे यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीसंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावरून संजय राऊत यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर निशाणा साधला होता. संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा विषय हा छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेना यांच्यातील आहे. इतरांनी त्यामध्ये चोमडेपणा करू नये. भाजपला इतकेच वाटत होते तर त्यांनी संभाजीराजे यांना ४२ मते द्यायला पाहिजे होती, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. यानंतर साताऱ्यात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला बक्षीस देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उदयनराजेंनी संजय राऊत यांच्यावर चांगलीच आगपाखड केली.
आमच्याबद्दल वाईट बोलाल, तर आम्ही शांत बसणार नाही
उदयनराजे भोसले यांनी संजय राऊतांना त्यांच्याच स्टाईलमध्ये इशारा दिला आहे. खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, संजय राऊत कोण मला माहिती नाही. आम्ही कुणाबद्दल वाईट बोलत नाही. पण, आमच्याबद्दल जर कोणी वाईट बोलले तर आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. प्रत्येकाला आपल्या घराण्याचा स्वाभिमान आहे. त्यामुळे कोणी शांत बसणार नाही. बाकी काही पेटले तरी चालेल बघतोच, या शब्दांत उदयनराजे यांनी संजय राऊतांना डोस दिला.
दरम्यान, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला उदयनराजे यांनी बक्षीस म्हणून थेट बुलेट देण्याची घोषणा केली होती. सातारा येथे उदयनराजे यांच्या जलमंदिर या निवासस्थानी या बक्षीस वितरणाचा भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी उदयनराजे यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील याला बुलेट बक्षीस म्हणू देण्यात आली. पृथ्वीराज पाटील याला जी बुलेट उदयनराजेंकडून देण्यात आली त्या बुलेटला उदयनराजे यांचा खास ०००७ हा नंबरही देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment