वेध माझा ऑनलाइन। ड्रगमाफिया ललित पाटील याला आज सकाळी नाशिक जिल्ह्यातील शिंदे गावातील ड्रग फॅक्टरीत नेण्यात आले होते. ललित पाटीलला गेल्या आठवड्यात बंगळुरूमधून अटक करण्यात आली. त्यानंतर ललित पाटीलच्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. त्यासाठीच त्याला शिंदे गावातील त्याच्या ड्रग फॅक्टरीत आणले होते. तिथे १५ ते २० मिनिटे थांबल्यानंतर ललितला पुन्हा मुंबईला नेण्यात आले. विशेष म्हणजे ललितला नाशिकला आणले आहे, याची नाशिक पोलिसांना काहीच माहिती नव्हती. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ललिल पाटीलला पोलीस व्हॅनऐवजी साध्या कारमधून नाशिकला नेण्यात आले होते आणि पोलीस देखील युनिफॉर्मऐवजी साध्या वेशात होते.
ललित पाटीलला १७ ऑक्टोबर रोजी बंगळुरूमधून अटक केली आणि १८ ऑक्टोबरला त्याला मुंबईतील अंधेरी कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याला कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पोलीस त्यांची कोर्टात कोठडी वाढवून मागतील. दरम्यान, साकीनाका पोलिसांनी ललित पाटीलच्या ड्रग रॅकेटप्रकरणी ऑगस्टपासून तपास सुरू केला होता. १ ऑक्टोबरला तो ससून रुग्णालयातून फरार झाला, त्यानंतर त्यांच्या नाशिकमधील ड्रग्ज फॅक्टरीवर साकीनाका पोलिसांनी कारवाई केली
मुंबई पोलिसांनी नाशिक पोलिसांना काहीही न कळवता आज सकाळी थेट ललित पाटीलला सोबत घेऊन नाशिकच्या शिंदे गावातील ती ड्रग्जची फॅक्टरी गाठली. ललित पाटील २०२१ पासून या फॅक्टरीत ड्रग्ज बनवत होता. पोलिसांनी ललित पाटीलला थेट फॅक्टरी उभे करून त्याच्याकडून बरीचशी माहिती घेतली. या फॅक्टरीत ड्रग्ज कसे तयार केले जायचे?, त्यासाठी माल कुठून आणला जायचा?, या ड्रग्जची विक्री आणि वितरण कसे केले जायचे?, ही सर्व माहिती पोलिसांनी ललित पाटीलकडून घेतल्याचे समजते. त्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांनंतर मुंबई पोलीस ललित पाटीलला घेऊन परत मुंबईकडे रवाना झाले.
वास्तविक ड्रगमाफिया ललित पाटील याचे नाशिकमध्ये घर आहे. शिवाय नाशिक शहरात त्याच्या मालमत्ता देखील आहेत. शिवाय ड्रग्जच्या पैशांतून ललित पाटीलने आठ किलो सोनेदेखील खरेदी केले आहे. ते सोने कोणकोणत्या सराफांकडून खरेदी केले आहे, याचीही माहिती मुंबई पोलीस घेणार आहेत. त्यासाठी पुन्हा ललितला पुन्हा नाशिकला आणले जाईल, अशी चर्चा आहे. दरम्यान, ललिल पाटीलवरून राज्यातील राजकारणदेखील जोरात सुरू आहे. भाजपने या प्रकरणी उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत. तर संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केले आहेत.
No comments:
Post a Comment