वेध माझा ऑनलाइन। मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांचे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी कराड (जि.सातारा) येथे मराठा समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चातील मोर्चेकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने मोर्चा होईपर्यंत अन्न आणि पाणी त्याग करण्याचा निर्णय आज येथे झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
कराड तालुका सकल मराठा मोर्चाच्यावतीने सोमवारी कराडच्या तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चाला प्रारंभ होईल. तेथुन तो आझाद चौक मार्गे चावडी चौक, तेथुन कन्याशाळेसमोरुन जोतीबा मंदिरापासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल. तेथुन महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मुख्य पोस्टासमोरुन कर्मवीर पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा दत्त चौकातुन तहसीलदार कार्यालयासमोर नेण्यात येईल. या मोर्चात अग्रभागी महिला आणि तरुणी असणार आहेत. त्यांच्यापाठीमागे मराठा बांधव आणि तरुण असतील. तेथे प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात येईल. तेथे मोर्चाचा समारोप होईल.
मोर्चात सहभागी होणाऱ्यांनी मोर्चा होईपर्यंत अन्न आणि पाणी त्याग करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याचबरोबर मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी समाजाकडुन आचारसंहिताही जारी करण्यात आली आहे. त्यानुसारच मोर्चा निघणार आहे. मोर्चात देण्यात येणाऱ्या घोषणा कोणत्या असतील हेही अंतीम करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment