Saturday, October 28, 2023

आमदार अपात्रेसंदर्भात 30 ऑक्टोबर ला कोर्टात काय होणार ?

वेध माझा ऑनलाइन। आता एक मोठी बातमी आमदार अपात्रता प्रकरण संदर्भातील. सोमवारी म्हणजेच ३० ऑक्टोबरला या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची याचिका, अशा या दोन्ही याचिकांवर सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठात या याचिकेवर सुनावणी होणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष कोणते नवे वेळापत्रक दाखल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार अपात्रतेचे प्रकरण निकाली लावण्यासाठीचे वेळापत्रक विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सादर करण्याची सोमवारी अखेरची संधी आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष किती दिवसांत निर्णय घेतील, हे त्यांच्या वेळापत्रकावरून सोमवारी स्पष्ट होईल.

आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे. पण, या प्रकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. एवढेच नाही तर हे प्रकरण वेगाने मार्गी लावावे, यासाठी ठाकरे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण वेगाने निर्णय द्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा, अशी विनंती ठाकरे गटाने या याचिकेतून केली होती. पण यापूर्वीच्या दोन सुनावणींच्या वेळी विधानसभा अध्यक्षांनी वेळापत्रक दाखल न केल्यामुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नाही तर १७ ऑक्टोबरला रोजीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ३० ऑक्टोबरची डेडलाईन विधानसभा अध्यक्षांना दिली होती. त्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना नवरात्र उत्सवाच्या काळात भेटून वेळापत्रक तयार करू, अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली होती.

त्यामुळे त्यांचे वेळापत्रक तयार झाले आहे का, आणि ते सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात ठाकरे गटाची याचिका आहे तशीच याचिका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे शरद पवार गटाचीही आहे. या दोन्ही याचिकांवर सोमवारी सुनावणी आहे. दोन्ही याचिका सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठात आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने जून २०२२ मध्येच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाचा ११ मे २०२३ रोजी निकाल लागला. त्यात आमदार अपात्रतेचा विषय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. पण मे २०२३ पासून विधानसभा अध्यक्षांनी यात लक्ष न घातल्याचा आरोप करत हे प्रकरण वेगाने निकाली काढावे, यासाठी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर यंदा २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार सत्तेत सहभागी होऊन त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आणखी ८ आमदारांनीही शपथ घेतली होती. त्यामुळे शरद पवार गटानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता या दोन्ही याचिकांवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

No comments:

Post a Comment