Monday, October 30, 2023

मराठा आंदोलक आक्रमक, आमदारांच्या घर अन् कार्यालयावर हल्ले ; मुंबईत नेत्यांच्या सुरक्षेत वाढ ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनास सोमवारी हिंसक वळण लागले. मराठा आरक्षणावरून जाळपोळ, दगडफेक अन् तोडफोड होत आहे. यामुळे एसटी महामंडळाने अनेक बसेस रद्द केल्या. राज्यातील विविध भागांत आंदोलक आमदारांना लक्ष करत आहेत. त्याचा फटका आमदार प्रशांत बंब, आमदार नामदेवराव ससाने, आमदार राहुल आहेर यांना बसला. बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचा बंगला पेटवून दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण संवेदनशील झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीची शिफारस स्वीकारली असल्याचे सांगितले.

आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय फोडले
सोमवारी दुपारी आंदोलकांनी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, अशी घोषणाबाजी करत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयात प्रवेश केला. गंगापूर शहरातील त्यांचे कार्यालय आंदोलकांनी फोडले. कार्यालयातील काचा फोडल्या. खुर्च्या तोडल्या. त्यापूर्वी मराठवाड्यातील माजलगावमध्ये अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांचे घर पेटूवले. त्यानंतर माजलगाव नगरपालिकाही पेटवून दिली.

यवतमाळमध्ये आमदार ससाने यांना रोखले
उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांनाही मराठा आंदोलनाचा फटका बसला. यवतमाळ येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात जात असताना मराठा समाज बांधवांनी त्यांची गाडी अडवली. यामुळे मराठा आंदोलनाची धग मराठवाड्यापासून विदर्भापर्यंत सर्वत्र पोहचली आहे. यवतमाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मालेगावात राहुल आहेर यांना फटका
मालेगावात मराठा आंदोलनाचा फटका राहुल आहेर यांनाही बसला. आंदोलकांनी त्यांची गाडी आडवली. मालेगाव पुणे महामार्ग रोखला. नांदगाव फाट्यावर कौळाने येथे महामार्ग रोखला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

मुंबईत नेत्यांच्या सुरक्षेत वाढ
मुंबईतील काही नेत्यांची घरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राज्याचे कॅबीनेट मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या शासकीय सिद्धगड निवासस्थानी सुरक्षा मोठया प्रमाणात वाढवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी जरंगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment