वेध माझा ऑनलाइन। : आज शासनाने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे. शासनाने काय करायचे ते करावे. बुधवारी रात्रीपर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आज रात्रीपासून पाणी पिणे बंद करणार असून, होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांबाबत जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही. शासनाने शिंदे समितीचा अहवाल स्वीकारावा. विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण देण्याची भूमिका जाहीर करावी.
दरम्यान, राज्यभरात आंदोलनाचा वणवा भडकलेलाच असून, बीड, धाराशिवमध्ये संचारबंदी तर जालन्यामध्ये इंटरनेटबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको, आमरण उपोषण करण्यात आले. नांदेडच्या कोटा फाटा येथे उपोषणकर्त्यावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचे सत्र सुरूच असून मंगळवारी दिवसभरात सात जणांनी मृत्यूला कवटाळले.
जरांगे पाटील म्हणाले...
शासनाने जाती-जातींमध्ये भांडणे लावू नयेत. कोणाला रस्त्यावर यायचे त्यांनी यावे. इंटरनेट बंद करा किंवा इतर जातींना अंगावर घाला.
परंतु आता मराठ्यांचे आंदोलन थांबणार नाही. आपण भाऊ-भाऊ म्हणतो; परंतु कोणी अंगावर आले, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ. आत्महत्या करू नका, कायदा हातात घेऊ नका.
बीडमध्ये झालेला प्रकार कोणी केला ते माहिती नाही; परंतु शांततेत सुरू असलेले आंदोलन करू द्या. पोरांवर गुन्हे दाखल करून त्रास देऊ नका, अन्यथा मी बीडमध्ये जाईन.
No comments:
Post a Comment