Thursday, October 26, 2023

शिंदे, फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात एवढी गुप्तता कशासाठी? अजित पवारांनाही कल्पना दिली नाही, नेमके काय शिजतेय

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणासाठीची मराठा समाजाने दिलेली मुदत संपल्याने मनोज जरांगे पाटील दुसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तडकाफडकी दिल्लीत गेले आहेत. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींसोबत या दोघांनी खूप वेळ चर्चाही केली, परंतू हे दोघे कुठे आहेत, कोणाला भेटले याचा काहीच थांगपत्ता लागत नाहीय. अशातच दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मोठे वक्तव्य आले आहे. 

शिंदे, फडणवीस दिल्लीत गेल्याची आपल्याला काहीच माहिती नाहीय. ते मला विचारून गेलेले नाहीत, माहिती घेतो आणि बोलतो. आज मी मंत्रालयात व्यस्त होतो यामुळे या घडामोडींची कल्पना नाहीय, असे अजित पवार म्हणाले आहेत. गुरुवारी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर आहे. मी इथे नसणार, असेही ते म्हणाले. 

दिल्लीत दाखल होताच शिंदे-फडणवीस सुरक्षा रक्षकांना सोडून  अज्ञातस्थळी रवाना झाल्यामुळे मराठा आरक्षण तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित इतर विषयांवर दिल्लीत चर्चेत नेमके काय शिजले याविषयी उत्सुकता होती.
सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमाराला दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना हुलकावणी दिली. नेहमीप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ६ अ, कृष्ण मेनन मार्ग निवासस्थानी त्यांची बैठक होईल, अशी अपेक्षा होती. पण, खुद्द अमित शाहच आपल्या निवासस्थानाहून ताफा घेऊन बाहेर पडले. परंतु, बैठक कुठे सुरू आहे याचा चार तासांनंतरही थांगपत्ता लागू शकला नव्हता. 
राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार, महामंडळ वाटप, आमदार अपात्रता सुनावणी आणि मराठा आरक्षणावरूव राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.

No comments:

Post a Comment