वेध माझा ऑनलाइन । मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला मराठवाड्यात हिंसक वळण लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांत मराठवाड्यात 3 तहसीलदारांच्या गाड्या फोडण्यात आल्या आहेत. परभणीच्या मानवत तालुक्यातील मानोली येथे तहसीलदारांची गाडी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. असे असताना बीडमध्ये आंदोलकांनी जाळपोळ करायला सुरुवात केली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी भवन पेटवल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला आग लावण्यात आलेली आहे. शिवाय माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय पेटवून देण्यात आलेलं आहे. बीडमध्येच मंत्री छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते सुभाष राऊत यांचं हॉटेल पेटवून देण्यात आलेलं आहे.
बीड शहरामध्ये आगीच्या चार ते पाच घटना घडल्या आहेत. आंदोलकांनी शांतता पाळावी, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांची दगडफेक करण्यात आली आहे. मनोज जरांगेंच्या संदर्भात सोळंकेंनी काल वक्तव्य केलं होतं. बंगल्याच्या आवारात प्रवेश करत आंदोलकांनी प्रकाश सोळंकेंच्या गाड्याही जाळल्या. नंतर घर पेटवून देण्यात आल्याचे वृत्त आहे.
मी समाजाला सांगितले होते, साखळी उपोषण आणि आमरण उपोषण करा. मराठा समाज जे सांगेल ते काम मी करतोय. जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. मराठा समाजाचं आंदोलन शांतते सुरू असताना हे कोण करतेय ही शंका येतेय. जाळपोळ करणारे बहुतेक सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते असल्याचा संशय आहे. बहुतेक सत्ताधाऱ्यांची लोक जाणूनबुजून त्यांचीत घरं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाळून घेऊ लागलेत अशी शंका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे.
बीडसह राज्यभरात मराठा आंदोलकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. काही जाळपोळींच्या घटनाही घडल्या आहेत. याची झळ आमदार प्रकाश सोळंके, प्रशांत बंब आणि संदीप क्षीरसागर यांना बसली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. मराठा समाजाने शांत रहावं असं आवाहन करताना मनोज जरांगे म्हणाले की, सर्वाना माझी हात जोडून विनंती, आज रात्री आणि उद्या दिवसा कुठेही जाळपोळ कानावर येऊ देऊ नका. आंदोलन शांततेत सुरू आहे, ते पूर्ण करायचं आहे. आपण कुणाच्याही दारात जाचचं नाही.
No comments:
Post a Comment