Wednesday, October 18, 2023

शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या आर्थिक संपत्तींची चौकशी व्हावी ; हणमंतराव पाटील यांची मागणी ;

वेध माझा ऑनलाईन। राजू शेट्टी यांची जनआक्रोश यात्रा ही ‘मलिदा’ मागण्यासाठी निघालेली यात्रा आहे. तर सदाभाऊ खोत यांनी मंत्री झाल्यापासून शेतक-यांसाठी किती आंदोलने केली? त्यामुळेच सर्वच शेतकरी संघटनांच्या नेत्यांची आर्थिक संपत्तींची चौकशी व्हावी, अशी मागणी रघुनाथदादाप्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील व तालुकाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी इस्लामपूर येथे पत्रकार परिषदेत केली.

उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळाला पाहिजे तसेच दोन साखर कारखान्यांमधील व इथेनॉलमधील हवाई अंतराची अट कायमची काढून टाकण्याची मागणी राजू शेट्टी करत असतील तर आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य करू, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, 'शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी आपली स्वत:ची प्रॉपर्टी विकून संघटना चालवली. मात्र त्यांच्याच संघटनेतून वेगळ्या झालेल्या नेत्यांची आर्थिक संपत्ती किती आहे ती पहावी. शेट्टी यांची संघटना ही कारखानदारांनी पाळलेली संघटना आहे. कारखानदारांनी मलीदा दिला की हे आंदोलनात उतरतात. ते आमदार, खासदार झाल्यापासून शेतक-यांच्या उसाला दर मिळत नाही.

कारखानदारांनी या हंगामात उसाला ५ हजार रूपये दर द्यावा व मागील वर्षी गेलेल्या उसास दिवाळीपुर्वी १ हजार रूपये द्यावे. गाय दुधाला डिझेलचा तर म्हैस दुधाला पेट्रोलच्या दराप्रमाणे दर मिळावा. अन्यथा मुंबईला जाणारा भाजीपाला, साखर, दूध बंद करून गनीमी काव्याने आंदोलन करू."

धनपाल माळी म्हणाले, 'सरकारने बाहेरील राज्यात उस घालवण्यासाठी परवानगी नाकारली होती. मात्र सदाभाऊ बोलल्यावर ती मागे घेतली. सदाभाऊंचे महत्व वाढवण्यासाठी तुम्ही घोषणा केली होती काय? अशी शंका आहे.'असेही ते यावेळी म्हणाले

No comments:

Post a Comment