Saturday, October 21, 2023

प्रकाश आंबेडकर जरांगे पाटलांबद्दल काय म्हणाले...?

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणाबाबत राज्यभर दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या सभांना लाखोंची गर्दी उसळत आहे. मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या, ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, यासाठी ते आग्रही असल्याने ओबीसीमधील अनेक पक्षही याला विरोध करत आंदोलने करत आहे. मराठा समाजासाठी आरक्षण मागणाऱ्या जरांगे-पाटील यांची प्रतिमा निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर जरांगे-पाटील यांच्या मदतीला धावले आहेत. ‘शासनाने जरांगे-पाटलांशी इमानदारीने बोलावे’, असे आंबेडकर यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा आज (२१ ऑक्टोबर २०२३ रोजी) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर प्रथमच एका मंचावर आले होते. या कार्यक्रम स्थळातून बाहेर पडल्यावर माध्यमांनी प्रकाश आंबेडकर यांना गाठले. तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणबाबत मत व्यक्त केले.

शासनाने जरांगे-पाटलांशी इमानदारीने बोलावे. गेल्या 4 ते 5 महिने ते आपली भूमिका मांडत आहे. पण सरकारला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. गावात गेल्यावर परिस्थिती वेगळी असल्याचे लक्षात येते. मनोज जरांगेंनी मिळणाऱ्या पाठिंब्यात अनेकजण असे आहेत की, जे लग्न झालेले नाहीत किंवा ज्यांच्या हाताला काम नाही. सामाजिक परिस्थिती फारच गंभीर आहे. सरकारने  फसवाफसवीचे राजकारण थांबवावे, नाहीतर ते त्यांच्यावर उलटेल, जरांगे-पाटील जमीनदार आहेत. या समाजाच्या कौटुंबिक- वैयक्तीक समस्या आहेत.’ असेही आंबेडकर यांनी सांगितले. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. तेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जरांगे-पाटील यांची विचारपूस केली होती.

No comments:

Post a Comment