Tuesday, October 24, 2023

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाला मोठे वळण; गिरणा नदीपत्रात मिळाले 100 कोटींचे ड्रग्ज ;

वेध माझा ऑनलाइन । ड्रग्ज रॅकेट प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. ड्रग्स माफिया ललित पाटील याने मुंबई पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज गिरणा नदीत फेकले होते. यानुसार, मुंबई पोलिसांनी मध्यरात्री गिरणा नदीपात्रात शोधमोहीम राबवली होती. या शोधमोहिमेत मुंबई पोलिसांच्या हाती पहाटेपर्यंत मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठा लागला आहे. पोलिसांनी सोमवारी, (23 ऑक्टोबर) मध्यरात्रीपासुन मंगळवारी, (24 ऑक्टोबर) पहाटेपर्यंत एक विशेष ऑपरेशन राबवले होते. यामुळे, या प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले असून पोलिस ललित पाटील आणि इतर संबंधितांची कसून चौकशी करत आहेत.

नाशिक ड्रग्ज रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला 17 ऑक्टोबरला बंगळुरूमधून अटक केली होती. 18 ऑक्टोबरला त्याला अंधेरी कोर्टात हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत (22 ऑक्टोबर) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ललित पाटीलला रविवारी, (22 ऑक्टोबर) सकाळी नाशिक जिल्ह्यातील शिंदे गावातील ड्रग फॅक्टरीत नेण्यात आले होते. त्याला शिंदे गावातील त्याच्या ड्रग फॅक्टरीत आणले होते. तिथे १५ ते २० मिनिटे थांबल्यानंतर त्याला पुन्हा मुंबईला नेण्यात आले. विशेष म्हणजे ललितला नाशिकला आणले आहे, याची नाशिक पोलिसांना काहीच माहिती नव्हती. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ललिल पाटीलला पोलीस व्हॅनऐवजी साध्या कारमधून नाशिकला नेण्यात आले होते आणि पोलीस देखील युनिफॉर्मऐवजी साध्या वेशात होते.

सोमवारी, (22 ऑक्टोबर) मुंबई पोलिसांनी न्यायालयाकडून पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली असता न्यायालयाने पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत (27 ऑक्टोबर) वाढ केली. ललित पाटील याचा वाहनचालक सचिन वाघ याच्या चौकशीतून गिरणा नदीपात्रात ड्रग्ज फेकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, मुंबई पोलिसांनी सोमवारी, (23 ऑक्टोबर) मध्यरात्रीपासुन मंगळवारी, (24 ऑक्टोबर) पहाटेपर्यंत एक विशेष ऑपरेशन राबवत या शोधमोहिमेतुन कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले.

नाशिकच्या सटाना रोडवरील लोहणेर ठेंगोडा गावानजीक गिरणा नदीपात्रातून हा ड्रग्जसाठा हस्तगत केला. या शोधकार्यासाठी रायगडमधील प्रशिक्षित स्कूबा डायव्हरची मदत घेण्यात आली. रात्रीच्या अंधारात सुमारे 15 फुट पाण्याखाली 3 ते 4 तास ही शोधमोहीम चालली. या नदीपत्रातून तब्बल दोन गोण्या भरून ड्रग्ज पोलिसांना मिळाले असून 40 ते 50 किलोपर्यंत असलेल्या या ड्रग्जची किंमत सुमारे 100 कोटींच्या आसपास आहे आतापर्यंत, या प्रकरणात ललित पाटिलसह 15 जणांना अटक करण्यात आली असून मुंबई पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. त्यामुळे, या प्रकरणातून अजून काय समोर येते हे पहावे लागेल.

No comments:

Post a Comment