वेध माझा ऑनलाइन। मनोज जरांगे-पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती ढासळत असून त्यांचे अंग थरथरत आहे. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार करा, अशी मागणी एका महिलेने केली आहे. एवढेच नाही तर जरांगे-पाटील यांच्यावर तातडीने उपचार न केल्यास आपण विष पिऊन आत्महत्या करू, असा इशाराही या महिलेने दिला आहे. सरकार आरक्षण देण्यास जाणूनबुजून विलंब करत आहे. अशात जरांगेंचे काही बरेवाईट झाल्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळाले तर काय फायदा, असा सवाल करत सरकारने तातडीने मराठा आरक्षण द्यावे, जरांगेंचा अंत पाहू नये, अशी विनवणी या महिलेने केली आहे.
ही महिला अंतरवाली सराटी गावात जरांगे-पाटील यांना भेटण्यासाठी आली होती. मात्र, जरांगे यांची प्रकृती पाहून तिने हंरबडा फोडला. त्यामुळे आता उपोषण स्थळी वातावरणात तणाव आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्यानंतर २५ ऑक्टोबरपासून उपोषणाला सुरुवात केली. आता मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार जरांगे-पाटील यांनी केला आहे. जरांगे-पाटील यांच्या उपोषणानंतर राज्यात अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. याची झळ दोन दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पाटील यांनाही बसली आहे. आता तर जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ अनेक गावागावांत कॅन्डल मार्च काढण्यात येत आहेत. काही ठिकाणी आक्रमक मराठा समाज नेत्यांना गावात येण्यापासून रोखत आहेत. मराठा आरक्षणासाठी मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment