वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर न केल्यास 25 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या उपोषण आंदोलन कोणतेही उपचार घेणार नसून पाणीदेखील पिणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन करताना जरांगे यांनी शांततेतील आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला. मंत्री, आमदार, खासदार, प्रशासनातील लोकांना गावबंदी करण्यात येणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या गावात आज मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटले की, राज्यातील मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ दिले जाणार नाही. प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषण करण्यात येणार आहे. सर्कल मधील सर्व गावाच्यावतीने एकाच ठिकाणी ताकदीने साखळी उपोषण सुरू केले जाणार आहेत. पुढे 28 ऑक्टोबरपासून त्याच साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. जनतेच्या मुळावर पाय देणे याला विकास म्हणत नाही, आमच्या मुंडक्यावर पाय देऊन कोणाला मोठं करायचे आहे असा सवाल त्यांनी केला.
प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात, प्रचंड संख्येने समाजाने एकत्रित येऊन कँडल मार्च काढण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी या वेळी केले. तूर्तास आंदोलनाची ही दिशा असून आंदोलनसुरू झाल्यानंतर 25 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा आंदोलनाची नवी दिशा सांगितली जाईल असेही त्यांनी म्हटले.
हे आंदोलन आणि साखळी उपोषण आणि त्याशिवाय 25 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पुढील आंदोलन सरकारला झेपणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
दरम्यान मनोज जरांगे यांनी यावेळी मराठा समाजाच्या आंदोलकांना आवाहन करताना म्हटले की, कोणीही उग्र आंदोलन करायचे नाही. त्याला आपले समर्थन नाही. कोणीही आत्महत्या करायची नाही. हेच शांततेच आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment