Sunday, October 22, 2023

पडळकरांकडून शरद पवारांबद्दल पुन्हा लांडगा म्हणून उल्लेख ; भाजपलाही दिला घरचा आहेर ; काय म्हणाले पडळकर?


वेध माझा ऑनलाइन। शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्याचवेळी शरद पवारांचा पुन्हा एकदा लबाड लांडगा असा उल्लेख पडळकरांनी केला. ‘आरक्षणाला पहिल्यांदा लबाड लांडग्याने विरोध केला. त्यांना मुख्यमंत्री असताना आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. पक्षातून पुतण्या फुटला आणि आता हे भुजबळांच्या मागे लागलेत’, अशी टीकाही पडळकरांनी शरद पवारांवर नुकतीच केली आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणासाठी आरेगावमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत पडळकर यांनी शरद पवारांचा पुन्हा एकदा लबाड लांडगा असा उल्लेख केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी याआधीही शरद पवारांवर अनेकदा आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. तसेच यापूर्वी त्यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली होती.नुकताच  पडळकरांनी पवारांवर टीकेची तोफ डागताना लबाड लांडगा असा उल्लेख केला. त्यामुळे पडळकरांच्या या टीकेला शरद पवार गटाकडून उत्तर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

दरम्यान ,धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) प्रमाणपत्र द्यावे, ही धनगर समाजाची मुख्य मागणी आहे. त्यासाठी २१ सप्टेंबर रोजी सरकारसोबत बैठक झाली होती. त्यावेळी मी सरकारला अनेक जीआर दिले. तरीही तेव्हापासून सरकारने धनगर आरक्षणाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी कुठलेही पाऊल उचललेले नाही, असा घराचा आहेर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला दिला. वास्तविक सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेचे समर्थन केले पण त्यानंतर साधी समितीही स्थापन केली नाही. आता तरी सरकारने समिती स्थापन करून इतर राज्यांमध्ये पाठवावी, अशी आग्रही मागणी गोपीचंद पडळकर यांनी या सभेत केली. सरकारच्या हातात अजून २९ दिवस आहेत. तोपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.


No comments:

Post a Comment