वेध माझा ऑनलाइन। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाप्रश्नी चाललेल्या आमरण उपोषणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण आता चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने आता लवकरात लवकर पावले उचलावित यासाठी आणि जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मराठा आंदोलकांकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. यातच, शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा समाजाच्या भावना लक्षात घेत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. हेमंत पाटील यांनी आपला राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी, आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार हेमंत पाटील यावेळी म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असून शासनाकडून कुठल्याच प्रकारची भूमिका घेतली जात नाही. राजकीय नेत्यांना गावबंदीदेखील करण्यात आली आहे. अशा परिस्थिती समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेवून मी खासदारकीचा राजीनाम देत आहे.”
No comments:
Post a Comment