Monday, October 23, 2023

वेध माझा ऑनलाइन। भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे उद्या काय बोलणार, याकडे सर्वांचेच खास करून भाजप नेत्यांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांचा उद्या (२४ ऑक्टोबर) दसरा मेळावा आहे. दरवर्षी त्या बीडमधील भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा घेतात. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने त्यांचे समर्थक येतात. यावेळी ते कोणत्या मुद्द्यावरून समर्थकांना मार्गदर्शन करणार, कोणते राजकीय भाष्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पंकजा मुंडे या जरी पक्षाच्या राष्ट्रीय सचिव असल्या तरी त्यांच्यावर राज्यातील कुठलीही जबाबदारी नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याची नेहमीच चर्चा होते. म्हणूनच दसरा मेळाव्यात त्या काय बोलणार, याकडे सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधकांचेही लक्ष लागले आहे.

यापूर्वी मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे आता आमदारही नाहीत. त्यांना विधानपरिषदेवर घेणार अशी चर्चा होती आणि ती चर्चाच राहिली. राज्याची कुठलीच जबाबदारी पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर सोपवली नसल्याने अधूनमधून कधीतरी नाराजीचा सूर निघतो, पण त्यावर त्यांनी थेट वक्तव्य कधीही केलेले नाही. म्हणूनच या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्याला बीडमधील भगवान भक्तीगडावर येताना समर्थकांना त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. आणि त्याचा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या X हँडलवर अपलोड केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने आणि उत्साहाने तुम्ही येणार आहात तरीही नियम पाळून या, असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment