Wednesday, July 31, 2024

गॅस सिलेंडर महागला ; वाचा बातमी ...


वेध माझा ऑनलाइन।
आज 1 ऑगस्टरोजी महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्व सामान्यांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्या आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठे बदल केले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.

आजपासून दरवाढ
आजपासून देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये जवळपास 8 ते 9 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, ही वाढ केवळ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये बदल झाला नाही.

लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ - 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार

वेध माझा ऑनलाइन।
 महाराष्ट्र सरकारनं 2024-25 चा आर्थिक अर्थसंकल्प सभागृहात सादर करताना राज्यातील महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024' जाहीर केली. त्याद्वारे राज्यातील महिलांना 18 ते 60 वर्ष वयोगटातील सर्व महिलांना दरमाहा आर्थिक मदत जाहीर केली जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गावागावंत महिलांनी मोठी गर्दी केली. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. राज्यभरातील महिलांची गर्दी पाहता आता सरकारनं लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ज्या-ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही, त्यांना 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री कार्यालयाचं अधिकृत सोशल मीडिया हँडल @CMOMaharashtra वरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, "राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार... ताई तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. त्याला तुम्हा सर्वांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद, ताई कुणालाही किती विरोधात बोलू देत, तू काळजी करू नकोस, राज्यातील महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, पोषणासाठी तुला दरमाहा दीड हजार रुपये म्हणजेच, वर्षाला 18 हजार रुपये देण्याचा निर्णय तुझ्या भावानं घेतला आहे. योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून आणि नाव नोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून आम्ही अर्ज भरण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट केली आहे. त्यामुळे ज्या बहिणी 31 ऑगस्ट रोजी अर्ज करतील, त्यांनाही जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे." 

तसेच, मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शनही लिहिण्यात आलं आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद. अर्ज भरण्याची मुदत आता 31 ऑगस्ट. अंतिम मुदतीत नोंदणी करणाऱ्यांना देखील मिळणार जुलैपासून लाभ मिळणार. योजनेचा लाभ घेण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं आहे.

पावसाचा जोर आणखी वाढणार ; सातारा जिल्ह्यला यलो अलर्ट ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यभरात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस बरसला आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या 138 टक्के जास्त पाऊस झाल्याची माहिती  पुणे वेधशाळेने दिली आहे. मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि विदर्भ येथे पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.हवामान विभागाने आता येत्या 4 ते 5 दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज दिला आहे. राज्यातील अनेक धरणे 90 टक्के भरले असून पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.


‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागान ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

तसेच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात दोन ते तीन ऑगस्टला तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 आणि 3 ऑगस्टला येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.



महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर ; काय आहे पात्रता ?काय आहेत निकष?

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वर्षाच्या पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. येत्या १९ ऑगस्टला रक्षाबंधनच्या निमित्ताने हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेमुळे महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे. आता या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरवर्षी ३ मोफत गॅस सिलेंडर सुद्धा मिळणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत हे गॅस सिलेंडर महिलांना मिळणार आहेत. त्यासाठी पात्रता निकष काय आहेत...?

अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील तब्बल 52 लाख 16 हजार पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतंर्गत वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत दिले जातील. यामध्ये आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही समावेश झाला आहे. लाडक्या बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी लवकरच जाहीर होईल. त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ राज्यातील किती महिलांना मिळेल ते स्पष्ट होईल. राज्यात सध्या 3 कोटी 49 लाख कुटुंबांकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणी आहेत. मात्र, दोन्ही योजनांचे निकष पाहता यापैकी 2 कोटी कुटुंबाना संबंधित योजनेचा लाभ मिळू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

काय आहे पात्रता निकष ?

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे.
एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल.
तसेच फक्त १४.२ किलेग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल

कराड तालुक्यातील ओंड येथील डॉक्टरची दवाखान्यातच आत्महत्या ; कारण अद्याप अस्पष्ट;

वेध माझा ऑनलाइन।
कराड तालुक्यातील ओंड येथील डॉ. हेमंत प्रभाकर रेळेकर /वय ५०/ यांनी आपल्या दवाखान्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, बुधवारी सकाळी घडली आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की, 
आज बुधवारी सकाळी डॉ. हेमंत रेळेकर हे नेहमी प्रमाणे आपल्या दवाखान्यात आले. यावेळी ते बराचवेळ घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी दवाखान्यात जाऊन पाहिले. यावेळी त्यांनी दवाखान्यामध्येच एका खोलीमध्ये गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी याची माहिती कराड तालुका पोलिसांत दिली दरम्यान आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.


एक तर तू राहशील... नाहितर मि राहीन ; उद्धव ठाकरेंचा फडणवीसाना इशारा ;


वेध माझा ऑनलाइन।
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना सर्वात मोठा इशारा दिला आहे. आता एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान दिले आहे. मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासहित भाजपवर तुफान हल्लाबोल चढवला. उद्धव ठाकरेंनी थेट आरपारची भूमिका घेतल्याने आगामी काळात भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, अनिल देशमुखांनी सांगितलं की, कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. हे सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलेलो आहे. आता एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन. अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष, चिन्ह आणि पैसा नाही. पण मी केवळ तुमच्या ताकदीवर या सगळ्यांना आव्हान देत आहे. मी म्हणजे मी नाही, तुम्ही सगळे आहात. दिल्लीच्या छातीत उद्धव ठाकरेची नाही तुमची धडकी भरली आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिले आहे.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समाचार घेतला. जोपर्यंत आपण सरळ होतो, तोपर्यंत सरळ असतो. पण एकदा वाकड्यात घुसलो की आपण वाकडं करतो. शिवसेना ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे तर भाजप म्हणजे चोर माणसं, राजकारणातील षंढ माणसं आहे. लोकसभा निवडणुकीत आपण असा नडलो की मोदींना घाम फोडला. नरेंद्र मोदींचे भाषण बघताना आता किव येते, मी कधी नगरसेवक झालो नव्हतो, थेट मुख्यमंत्री झालो. जे जे शक्य होतं, ते सगळं मी केले हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणार कोणी राहणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हंटल. तरीही अजून कोणाला जायचं असेल तर उघडपणे जा आणि आत राहून दगाबाजी करु नका. शिवसैनिकांना सोबत घेऊन मी पुन्हा एकदा लढून आणि जिंकून दाखवीन असा निश्चय उद्धव ठाकरेंनी केला

कराड शहराला सुरळीत पाणीपुरवठा दया - आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना ; आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पाईप लाईनच्या कामाचा आढावा कोयना पुलावरील पाईप लाईनची उद्या चाचणी ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्याला प्राधान्य ठेवा अशा सक्त सूचना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिल्या. 

कराड शहराला वारूंजी जॅकवेल मधून पाणीपुरवठा होण्यासाठी नवीन कोयना पुलावरून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे हे काम अंतिम टप्प्यात असून गुरुवारी एक ऑगस्टला या पाईपलाईनची चाचणी होऊन कराड शहराला दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत माहिती दिल्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही चाचणी यशस्वी झाल्यास दोन दिवसात पर्यायी पाईपलाईन मधून शहराला पाणीपुरवठा सुरळीत होईल. 
माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथील नवीन कोयना पुलावर भेट देऊन पुलावरून येणाऱ्या पर्यायी पाईपलाईनच्या कामाची पाहणी केली तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या कार्यालयात पाणीपुरवठा प्रश्नाचा आढावा घेतला त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागल्यानंतर नगरपालिकेने तातडीने जुना जॅकवेल कार्यान्वित केला होता मात्र त्याची विद्युत वाहिनी तुटली होती ती विद्युत वाहिनी आता नवीन टाकण्याचे काम तातडीने सुरू आहे ही विद्युत वाहिनी कार्यान्वित केल्यानंतर शहराचा डिझेल जनरेटर वर असणारा पाणीपुरवठा बंद होऊन जुन्या जॅकवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणार आहे. 
त्याचबरोबर नवीन कोयना पुलावरून पाईपलाईन टाकण्याचे काम अंतिम टप्यात सुरू असून हे काम दोन दिवसात पूर्ण होईल. पाईपलाईनला काही ठिकाणी वळणे आहेत त्यामुळे पाणी क्षमता किती राहणार याबाबत शंका आहे तरीसुद्धा या गोष्टीला सद्यस्थितीत पर्याय नाही. हे काम पूर्ण झाल्यानंतर या पाईपलाईनची चाचणी घेण्यात येईल. ती यशस्वी झाल्यानंतर शहराला नियमित पाणी पुरवठा सुरू होईल. अशी माहिती आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. 

कराड शहराला रोज ३० एम एल डी पाण्याची गरज असून जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रोज २२ ते २३ एम एल डी पर्यंत पाणी पुरवठा होईल, असे सांगितले आहे. मात्र प्रत्यक्षात पाहणी केली असता हे शक्य होईल का याची मला शंका वाटत आहे. कारण जल वाहिनीला वळण असत नाही. या पाईपला १२० अंशाचे वळण टाकावे लागले आहे. तरीपण १८ ते २० एम एल डी पर्यंतचा पाणी पुरवठा होईल. ही पर्यायी व्यवस्था काही दिवसांसाठी असेल. मात्र कायमस्वरूपी पर्याय म्हणून नवीन कोयना पुलावरून ६०० मिलिमीटर व्यासाच्या दोन पाईप लाईन टाकाव्या लागणार आहेत. या पुलाची हा दाब सहन करण्याची क्षमता आहे का, याची तपासणी करण्याबाबत जिल्हाधिकार्यांशी बोलणे झाले आहे. महामार्ग ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशीसुद्धा बोलणे झाले आहे. काम समाधानकारक सुरू आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर पाणी पुरवठा किती क्षमतेने होईल, हे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

पश्चिम महाराष्ट्रात कोंग्रेसने दिली टोल विरोधी आन्दोलनाची हाक ; 3 ऑगस्ट रोजी होणार भव्य आंदोलन कोंग्रेस नेते सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण,आमदार विश्वजीत कदम होणार सहभागी ; काय आहे बातमी...?

वेध माझी ऑनलाइन।
काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. टोल माफ व्हावा, टोलमध्ये सवलत मिळावी यासाठी मोठं आंदोलन उभं केलं जाणार आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या  दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने येत्या शनिवारी 3 ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बडे नेते एका एका टोल नाक्यावर उभं राहून, आंदोलन करणार आहेत. आपआपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे नेते आंदोलनात उतरतील. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. 

काँग्रेसकडून टोल नाका परिसरात चक्काजाम करण्याचं नियोजन आहे. चक्काजाम आंदोलन करून वाहने विना टोल सोडली जाणार आहेत. शनिवारी सकाळी दहा वाजता पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात कोल्हापूरसह पेठनाका, कराड , सातारा, खेड शिवापूर  येथील टोलनाक्यावर आंदोलन केलं जाणार आहे.  रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने आणि दुरावस्था झाल्याने काँग्रेसने या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,आमदार विश्वजीत कदम , काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत.

कोणत्या नेत्याकडे कोणत्या टोलची जबाबदारी?

कोल्हापूरच्या किणी टोल नाका येथे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते थांबून आंदोलन करणार आहेत. सातारा जिल्ह्यातील तासवडे टोल नाका येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली आणि कराडमधील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील.  सातारा जवळच्या आनेवाडी टोल नाक्यावरती सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील.  पुण्यातील खेड शिवापूर या टोलनाक्यावर काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील.

मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट ; मोठी बातमी...

वेध माझा ऑनलाइन
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगेंवर करण्यात आला आहे. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला जरांगे पाटील कोर्टात हजर राहणार आहेत. 2 ऑगस्टला पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर मनोज जरांगे पाटील हजर राहणार आहेत. न्यायालयात हजर राहण्यासाठी मनोज जरांगे पाटील उद्या पुण्याकडे निघणार आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे वॉरंट काढलं आहे. अटक वॉरंट काढल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे देखील अॅक्शन मोडमध्ये आहेत. न्यायालयात हजर राहण्यासाठी मनोज जरांगे पाटील उद्या दुपारी पुण्याकडे निघणार आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगेंवर करण्यात आला आहे. त्यानंतर मनोज जरांगेंना न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र दिलेल्या तारखेला हजर न राहिल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटकच वॉरंट काढलं होतं.

छत्रपती संभाजीराजे यांच्या नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक आणि अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

उद्या जरांगे पुण्याला येणार

मनोज जरांगे पाटील आणि आणखी दोघांच्या विरोधात याबाबत वारजे येथील धनंजय घोरपडे यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावलं होतं. मात्र आंदोलनामुळे जरांगे पाटील न्यायालयात हजर राहिले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे. उद्या जालन्यातून पुण्याला जाण्यासाठी मनोज जरांगे पाटील निघतील. त्यानंतर पुण्यातील न्यायालयात नेमकं काय घडतं? जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंटचं पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.