वेध माझा ऑनलाइन ।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत. पण हा अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागतेय. याच अडचणी कमी व्हाव्यात यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. 13 जुलै रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याच निर्णयात लाईव्ह फोटोसंदर्भात मोठा बदल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेने व्हावी याबाबत या योजनेच्या अटीत आता नव्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्म भरण्याची सोय करून देण्यात आली आहे. महिला नारीशक्ती, पोर्टल या वेगवेगळ्या माध्यमातून हा अर्ज करू शकतात. याआधी महिलांना अर्ज करताना आपला लाईव्ह फोटो द्यावा लागायचा. पण आता नव्या निर्णयाअंतर्गत तशी गरज भासणार नाही.
नव्या शासन निर्णयात नेमकं काय आहे?
नव्या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणे सोपे व्हावे यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत आता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच आता महिलांना फॉर्म भरताना आता स्वत:चा लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही.
दरम्यान, महिलांना 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. ही योजना फक्त आगामी निवडणुकीपुरती राबवण्यात येत आहे, असा दावा विरोधकांकडून केला जात होता. पण ही योजना आगामी काळातही चालूच राहील. ती निवडणुकीनंतर बंद केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते
No comments:
Post a Comment